लूक 19:16-31
लूक 19:16-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पहिला पुढे आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’ तेव्हा तो त्यास म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’ मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ आणि तो त्यास म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’ मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते. आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’ धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट दासा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’ त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’ ते त्यास म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’ धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हास सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्यास अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल तेसुध्दा काढून घेतले जाईल. परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’” येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला. तो वर जातांना, जेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठवले, व म्हटले, “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास बांधलेले आढळेल. ते सोडून येथे आणा. जर तुम्हास कोणी विचारले की, ‘तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, प्रभूला याची गरज आहे.’”
लूक 19:16-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मीनावर आणखी दहा मीना मिळविल्या आहेत.’ “त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या दासा! अतिशय थोडक्या बाबतीत तू विश्वासू राहिलास, म्हणून तू दहा शहरांची जबाबदारी घे.’ “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मीनावर आणखी पाच मीना मिळविल्या आहेत.’ “त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘तू पाच शहरांची जबाबदारी घे.’ “मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मीना घ्या; मी ती एका कापडात गुंडाळून जपून ठेवली होती, तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’ “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा! मी आता तुझ्या शब्दाप्रमाणेच तुझा न्याय करतो, तुला माहीत होते की मी कठोर स्वभावाचा आहे, जे माझे नाही ते बळकावितो आणि मी स्वतः पेरले नाही ते कापून नेतो, तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास हवे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’ “नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडून त्याची मीना घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मीना आहेत त्याला द्या.’ “पण ‘महाराज,’ ते म्हणाले, ‘त्याच्याजवळ आधीच दहा मीना आहेत.’ “यावर त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला सांगतो, कारण ज्याला आहे त्याला अधिक दिले जाईल व ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.’ आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.” हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते. जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ ते आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की: “समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल. ते सोडून इकडे आणा. ‘तुम्ही हे शिंगरू का सोडीत आहात?’ असे कोणी तुम्हाला विचारले, तर त्याला सांगा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’ ”
लूक 19:16-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’ मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ मग त्याने जवळ उभे राहणार्यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या वैर्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.” ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की, ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, “तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हांला आढळेल; ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हांला विचारलेच, तर ‘प्रभूला ह्याची गरज आहे,’ असे सांगा.”
लूक 19:16-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाब्बास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर मी तुला अधिकार देईन.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी पाच मोहरांची कमाई केली आहे.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही मी पाच नगरांवर अधिकार देईन.’ त्यानंतर आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा तुमची मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण कठोर असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही, ते आपण घेता व जे आपण पेरले नाही, त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच शब्दांत तुझा न्याय करतो. मी कठोर माणूस आहे, जे मी ठेवले नाही, ते घेतो व जे मी पेरले नाही, त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते ना? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता, तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ‘ह्याच्याकडून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ ‘मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ काहीच नाही, त्याचे जे आहे, तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल. परंतु ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये, असे होते, त्यांना येथे आणा व माझ्यासमोर ठार मारा.’” ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता. ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात त्याच्याजवळ असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, “तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे तेथे पोहोचताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू तुम्हांला बांधलेले आढळेल. ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडता, असे कोणी तुम्हांला विचारले, तर प्रभूला ह्याची गरज आहे, असे सांगा.”