YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 18:18-43

लूक 18:18-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एका यहूदी अधिकाऱ्याने त्यास विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करू?” येशू त्यास म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेत ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आई-वडीलांचा मान राख.” तो अधिकारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणासून पाळल्या आहेत.” जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्यास म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे. तुझ्याजवळचे सर्वकाही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल. मग ये. माझ्यामागे चल.” पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! होय, श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” मग पेत्र म्हणाला, “बघा, आमच्याकडे जे होते, ते सर्व टाकून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आई-वडील किंवा मुलेबाळ सोडली त्यांना या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.” येशूने निवडलेल्या बाराजणांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, “ऐका! आपण वर यरूशलेम शहरात जात आहोत आणि संदेष्टयांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते सर्व पूर्ण होईल. म्हणजे त्यास परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील, त्याची थट्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुंकतील त्यास फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल.” त्याने म्हटलेले काहीच शिष्यांना समजले नाही कारण हे वचन त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते आणि तो कोणत्या गोष्टीविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत नव्हते. येशू यरीहोजवळ येत असतांना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले, ही कशाची गडबड चालली आहे. लोकांनी त्यास सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.” तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.” जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!” येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली, तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्यास म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे.” ताबडतोब त्यास दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली.

सामायिक करा
लूक 18 वाचा

लूक 18:18-43 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एका शासकाने येशूंना विचारले: “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?” येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ” तो म्हणाला, “मी लहान होतो, तेव्हापासूनच मी या सर्व आज्ञांचे पालन करीत आहे.” जेव्हा येशूंनी हे ऐकले, ते त्याला म्हणाले, “पण तू एका गोष्टीत उणा आहेस. तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.” जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे! एखाद्या श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे बोलणे ऐकले, त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” येशूंनी उत्तर दिले, “जे काही मानवाला अशक्य आहे, परंतु त्या सर्वगोष्टी परमेश्वराला शक्य आहेत.” तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “आपणास अनुसरावे म्हणून आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!” “मी तुम्हाला निश्चित सांगतो,” येशूंनी म्हटले, “असे कोणी नाही की ज्यांनी परमेश्वराच्या राज्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, यांचा त्याग केला, त्याला या जगात अनेक पटीने दिले जाईलच पण येणार्‍या युगात सार्वकालिक जीवनही लाभेल.” येशूंनी त्यांच्या बारा शिष्यांना बाजूला बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले, “आपण यरुशलेमात जात आहोत आणि संदेष्ट्यांनी मानवपुत्रासंबंधी, म्हणजे माझ्याबद्दल, जे सर्वकाही लिहून ठेवलेले आहे ते पूर्ण होईल. त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. ते त्याची थट्टा करतील, त्याचा अपमान करतील आणि त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” त्यातील शिष्यांना काहीही समजले नाही. ते त्यांना आकलन होऊ नये म्हणून त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते. येशू काय बोलत आहेत हे त्यांना माहीत नव्हते. येशू यरीहो शहराजवळ आले, तेव्हा एक आंधळा भिकारी, रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. जवळून जात असलेल्या गर्दीचा आवाज त्याने ऐकला, तेव्हा त्याने विचारले काय चालले आहे. त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू रस्त्याने जात आहेत.” तो मोठ्याने ओरडला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” येशूंच्या पुढे चाललेल्या गर्दीतील लोकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो उलट अधिक मोठमोठ्याने ओरडतच राहिला, “अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” येशू थांबले आणि त्या मनुष्याला त्यांच्याकडे आणण्यास सांगितले. जेव्हा तो आंधळा जवळ आला, येशूंनी त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” “प्रभू मला दृष्टी यावी.” त्याने उत्तर दिले. यावर येशू म्हणाले, “ठीक आहे, तुला दृष्टी दिली आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि परमेश्वराची स्तुती करीत तो येशूंच्या मागे चालू लागला. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, त्यांनी सुद्धा परमेश्वराची स्तुती केली.

सामायिक करा
लूक 18 वाचा

लूक 18:18-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कोणाएका अधिकार्‍याने त्याला विचारले, “अहो उत्तम गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत : ‘व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.’ तो म्हणाला, “मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.” हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तो अतिशय खिन्न झाला हे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.” त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत, त्याला ह्या काळात पुष्कळ पटीने, व येणार्‍या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.” तेव्हा त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्याच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसर्‍या दिवशी पुन्हा उठेल.” त्यांना ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या. तो यरीहोजवळ आला तेव्हा असे झाले की, एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय आहे?” त्यांनी त्याला सांगितले, “येशू नासरेथकर जवळून जात आहे.” तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणार्‍यांनी त्याला दटावले; तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्यामागे चालू लागला; तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.

सामायिक करा
लूक 18 वाचा

लूक 18:18-43 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

एका यहुदी अधिकाऱ्याने येशूला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! मी काय केल्याने मला शाश्वत जीवन वतन म्हणून मिळेल?” येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी चांगला नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत:व्यभिचार करू नकोस; खून करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान कर.” तो म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.” हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझे अनुकरण कर.” पण हे ऐकून तो अतिशय खिन्‍न झाला कारण तो फार श्रीमंत होता. त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धनसंपत्ती आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे ऐकले त्यांनी विचारले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” त्याने उत्तर दिले, “जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.” पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आमचे घरदार सोडून तुला अनुसरलो आहोत.” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत, त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात शाश्वत जीवन मिळेल.” त्याने बारा शिष्यांना बाजूला घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण यरुशलेम येथे चाललो आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल. त्याची कुचेष्टा व विटंबना होईल. त्याच्यावर थुंकतील. त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल.” शिष्यांना मात्र ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही. खरे म्हणजे हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते म्हणून सांगितलेल्या गोष्टी त्यांना समजल्या नव्हत्या. येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय चालले आहे?” त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.” तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरीही तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशूने उभे राहून त्याला स्वतःकडे आणण्याचा आदेश दिला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी मिळावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी मिळो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी मिळाली आणि तो देवाचा महिमा वर्णन करीत त्याच्यामागे चालू लागला. हे पाहून सर्व लोकांनी देवाचे स्तवन केले.

सामायिक करा
लूक 18 वाचा