YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 18:18-43

लूक 18:18-43 MRCV

एका शासकाने येशूंना विचारले: “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?” येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ” तो म्हणाला, “मी लहान होतो, तेव्हापासूनच मी या सर्व आज्ञांचे पालन करीत आहे.” जेव्हा येशूंनी हे ऐकले, ते त्याला म्हणाले, “पण तू एका गोष्टीत उणा आहेस. तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.” जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे! एखाद्या श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे बोलणे ऐकले, त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” येशूंनी उत्तर दिले, “जे काही मानवाला अशक्य आहे, परंतु त्या सर्वगोष्टी परमेश्वराला शक्य आहेत.” तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “आपणास अनुसरावे म्हणून आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!” “मी तुम्हाला निश्चित सांगतो,” येशूंनी म्हटले, “असे कोणी नाही की ज्यांनी परमेश्वराच्या राज्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, यांचा त्याग केला, त्याला या जगात अनेक पटीने दिले जाईलच पण येणार्‍या युगात सार्वकालिक जीवनही लाभेल.” येशूंनी त्यांच्या बारा शिष्यांना बाजूला बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले, “आपण यरुशलेमात जात आहोत आणि संदेष्ट्यांनी मानवपुत्रासंबंधी, म्हणजे माझ्याबद्दल, जे सर्वकाही लिहून ठेवलेले आहे ते पूर्ण होईल. त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. ते त्याची थट्टा करतील, त्याचा अपमान करतील आणि त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” त्यातील शिष्यांना काहीही समजले नाही. ते त्यांना आकलन होऊ नये म्हणून त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते. येशू काय बोलत आहेत हे त्यांना माहीत नव्हते. येशू यरीहो शहराजवळ आले, तेव्हा एक आंधळा भिकारी, रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. जवळून जात असलेल्या गर्दीचा आवाज त्याने ऐकला, तेव्हा त्याने विचारले काय चालले आहे. त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू रस्त्याने जात आहेत.” तो मोठ्याने ओरडला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” येशूंच्या पुढे चाललेल्या गर्दीतील लोकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो उलट अधिक मोठमोठ्याने ओरडतच राहिला, “अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” येशू थांबले आणि त्या मनुष्याला त्यांच्याकडे आणण्यास सांगितले. जेव्हा तो आंधळा जवळ आला, येशूंनी त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” “प्रभू मला दृष्टी यावी.” त्याने उत्तर दिले. यावर येशू म्हणाले, “ठीक आहे, तुला दृष्टी दिली आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि परमेश्वराची स्तुती करीत तो येशूंच्या मागे चालू लागला. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, त्यांनी सुद्धा परमेश्वराची स्तुती केली.