YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 15:11-32

लूक 15:11-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग येशू म्हणाला, “एका मनुष्यास दोन पुत्र होते. त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या. आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली. त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. तेव्हा कोणी त्यास काहीही न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या. मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्यास म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही. परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले. यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. त्याने एका नोकराला बोलावून विचारले, हे सर्व काय चालले आहे? तो नोकर त्यास म्हणाला, तुमचा भाऊ आला आहे. तो तुमच्या पित्याला सुखरुप परत मिळाला म्हणून त्यांनी मोठी मेजवानी ठेवली आहे. तेव्हा तो रागे भरला आणि तो आत जाईना. तेव्हा त्याचा पिता बाहेर येऊन त्यास समजावू लागला. परंतु त्याने पित्याला उत्तर दिले, पाहा, इतकी वर्षे मी तुमची सेवाचाकरी केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडूसुद्धा दिले नाही. आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांवर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. तेव्हा पित्याने त्यास म्हणाले, बाळा, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.”

सामायिक करा
लूक 15 वाचा

लूक 15:11-32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू पुढे म्हणाले, “एका मनुष्याला दोन पुत्र होते. त्यातला धाकटा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेतील माझा वाटा मला द्या’ त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपली मालमत्ता त्यांच्यामध्ये वाटून दिली. “काही दिवस झाले नाही तोच, धाकट्या पुत्राने सर्वकाही जमा केले व दूर देशी निघून गेला तेथे आपला सर्व पैसा चैनबाजीत उधळून टाकला. सर्वकाही खर्च करून झाल्यानंतर, त्या संपूर्ण देशामध्ये कडक दुष्काळ पडला आणि त्याला गरज भासू लागली. तेव्हा तो गेला आणि स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते. “शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या बापाच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे. मी आता माझ्या बापाकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणवून घेण्‍यास लायक राहिलो नाही; मला एका चाकरांसारखे ठेवा.’ तेव्हा तो उठला आपल्या बापाकडे निघाला. “तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले. “मुलगा म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्‍यास लायक राहिलो नाही. मला तुमच्या नोकरासारखे ठेवा.’ “परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला. खास पोसलेले एक वासरू कापा. हा आनंदाचा प्रसंग आपण मेजवानीने साजरा करू. कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, आता तो जिवंत झाला आहे, हरवला होता, आणि आता तो सापडला आहे.’ त्यांनी अशा रीतीने आनंद केला. “तेवढ्यात थोरला मुलगा शेतातील आपले काम आटोपून घरी आला आणि त्याला घरातून येणारे नृत्यसंगीत ऐकू आले. तेव्हा त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ यावर त्याला सांगण्यात आले, ‘तुझा भाऊ परत आला आहे. तो सुखरुपपणे घरी आला म्हणून तुमच्या वडिलांनी एक पोसलेले वासरू कापले आहे!’ “हे ऐकताच थोरला भाऊ खूप रागावला. तो घरात जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि त्याला विनंती करू लागले. परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘बाबा, मी इतकी वर्षे सेवा केली आणि तुमची एकही आज्ञा मोडली नाही, तरी तुम्ही आजपर्यंत मी माझ्या मित्रांबरोबर आनंद करावा म्हणून एक करडूही दिले नाही. पण आता हा तुमचा पुत्र आपली सारी संपत्ती वेश्यांवर उधळून घरी आला, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापले आहे!’ “यावर त्याचे वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू माझ्याबरोबर नेहमीच असतोस आणि जे माझे आहे, ते सर्व तुझेच आहे. हा आनंदाचा प्रसंग हर्षाने साजरा करावयाचा आहे कारण तुझा भाऊ मरण पावला होता, तो आज परत जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ ”

सामायिक करा
लूक 15 वाचा

लूक 15:11-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आणखी तो म्हणाला, “कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यांपैकी धाकटा बापाला म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्वकाही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्यांतल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई; त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्‍यांना भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला मी योग्य नाही; आपल्या एका मोलकर्‍याप्रमाणे मला ठेवा.’ मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’ पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला, आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू; कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ मग ते आनंदोत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ त्याने त्याला सांगितले, ‘तुमचा भाऊ आला आहे; आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.’ तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला; परंतु त्याने बापाला उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’ त्याने त्याला म्हटले, ‘बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”’

सामायिक करा
लूक 15 वाचा

लूक 15:11-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते. त्यांपैकी धाकटा वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा हिस्सा मला द्या.’ वडिलांनी त्यांच्यांत मालमत्तेची वाटणी केली. फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला, तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने त्याच्याजवळ जे होते ते सर्व खर्च करून टाकल्यावर त्या देशात भीषण दुष्काळ पडला. त्याला अडचण भासू लागली. तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ काम मागण्यासाठी गेला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे, अशी त्याला फार इच्छा होई. कारण त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या वडिलांच्या किती तरी मोलकऱ्यांना अन्‍नाची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून माझ्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा.’ तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले. त्यांना त्याचा कळवळा आला. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्यांनी त्याचे मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी पात्र नाही.’ वडिलांनी दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला, पुष्ट वासरू आणून कापा, आपण आनंदोत्सव साजरा करू या; कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ त्यानंतर ते आनंदोत्सव करू लागले. तेव्हा त्याचा थोरला मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला. त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. त्याने एका चाकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ त्याने त्याला सांगितले, ‘तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.’ हे ऐकल्यावर तो रागावला व आत जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले. परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, तुमची एकही आज्ञा मी कधी मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. मात्र ज्याने तुमची मालमत्ता वेश्यांबरोबर उधळून टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’ त्याने त्याला म्हटले, ‘मुला, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, माझे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे. तरीदेखील उत्सव आणि आनंद करणे आवश्यक आहे; कारण हा तुझा भाऊ निधन पावला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’”

सामायिक करा
लूक 15 वाचा