नंतर येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते. त्यांपैकी धाकटा वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा हिस्सा मला द्या.’ वडिलांनी त्यांच्यांत मालमत्तेची वाटणी केली. फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला, तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने त्याच्याजवळ जे होते ते सर्व खर्च करून टाकल्यावर त्या देशात भीषण दुष्काळ पडला. त्याला अडचण भासू लागली. तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ काम मागण्यासाठी गेला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे, अशी त्याला फार इच्छा होई. कारण त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या वडिलांच्या किती तरी मोलकऱ्यांना अन्नाची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून माझ्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा.’ तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले. त्यांना त्याचा कळवळा आला. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्यांनी त्याचे मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी पात्र नाही.’ वडिलांनी दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला, पुष्ट वासरू आणून कापा, आपण आनंदोत्सव साजरा करू या; कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ त्यानंतर ते आनंदोत्सव करू लागले.
तेव्हा त्याचा थोरला मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला. त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. त्याने एका चाकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ त्याने त्याला सांगितले, ‘तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.’
हे ऐकल्यावर तो रागावला व आत जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले. परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, तुमची एकही आज्ञा मी कधी मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. मात्र ज्याने तुमची मालमत्ता वेश्यांबरोबर उधळून टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’ त्याने त्याला म्हटले, ‘मुला, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, माझे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे. तरीदेखील उत्सव आणि आनंद करणे आवश्यक आहे; कारण हा तुझा भाऊ निधन पावला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’”