YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 11:1-11

लूक 11:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती संपल्यावर शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “प्रभू, जसे योहानाने त्याच्या शिष्यांना शिकवले; त्याचप्रमाणे तुम्ही देखील आम्हास प्रार्थना करायला शिकवा.” मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो, आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे, आमच्या पापांची आम्हास क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव.” मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्यास म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्यास वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ आणि तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! मी अगोदरच दरवाजा लावलेला आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही.’ मी तुम्हास सांगतो की, जरी तो उठून त्यास काही देण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तरी त्याच्या मित्राच्या आग्रहामुळे तो खात्रीने उठून त्यास जितक्या भाकरींची गरज आहे तितक्या त्यास देईल. आणि म्हणून मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्यास मिळेल. जो कोणी शोधतो त्यास सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल?

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एके दिवशी येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होते. प्रार्थना संपल्यावर त्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्यांना म्हटले, “प्रभूजी, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले, त्याप्रमाणे तुम्हीही आम्हास शिकवा.” येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा: “ ‘हे पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो; तुमचे राज्य येवो. आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या. कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो; तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा आम्हास परीक्षेत आणू नका.’ ” येशू त्यांना म्हणाले, “समजा तुमचा एक मित्र आहे, मध्यरात्री तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणता, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; माझा मित्र प्रवास करून घरी आला आहे, पण त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’ समजा तुमचा मित्र आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नको. दार बंद झाले आहे आणि मी व माझी मुले अंथरुणात आहोत आणि आता मी उठून तुला काही देऊ शकत नाही.’ परंतु मी तुम्हाला सांगतो की, जरी मैत्रीमुळे तो उठून त्याला भाकर देणार नाही, तरी तुमच्या आग्रहामुळे तो नक्कीच उठेल आणि जितकी तुमची गरज आहे तितके तो तुम्हाला देईल. “मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल. “तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल?

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता; ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा : “हे [आमच्या स्वर्गातील] पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. [जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.] आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे; आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, [तर आम्हांला वाइटापासून सोडव.]” मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही;’ आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही’? मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे, की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल? किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल?

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

एकदा येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने पूर्ण केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभो, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले, तसे आपणही आम्हांला शिकवा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो. आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.” पुढे येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो मध्यरात्री त्याच्याकडे जाऊन भाकरी उसन्या मागू लागतो, ‘माझा एक मित्र माझ्याकडे आला आहे व त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही’ आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला भाकरी देऊ शकत नाही.’ मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नसला तरी त्याच्या आग्रहामुळे तो उठून त्याची गरज भागवेल. मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. जो कोणी मागतो त्याला मिळते; जो कोणी शोधतो त्याला सापडते; जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की, जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल?

सामायिक करा
लूक 11 वाचा