विलापगीत 3:17-24
विलापगीत 3:17-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस; कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही. मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.” माझे दुःख, कष्ट, कडू दवणा आणि विष ह्याचे स्मरण कर. मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे. पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते. ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे. माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.”
विलापगीत 3:17-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझी शांती हिरावून गेली आहे; समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे. म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.” माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते. ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो. तरीपण आशेचा हा एक किरण उरला आहे: याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही. त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे. मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.”
विलापगीत 3:17-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू माझ्या जिवाला शांतीपासून दूर ठेवले आहेस; समृद्धीला मी पारखा झालो आहे. तेव्हा मी म्हणालो, “माझी जीवनशक्ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा, गेली आहे.” माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर. माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे. हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. “परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन.