YouVersion लोगो
सर्च आयकॉन

विलापगीत 3

3
1याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात,
याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे.
2त्यांनी मला हाकलून लावले व
प्रकाशात नव्हे तर निबिड अंधारात मला चालविले आहे;
3निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर
माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे.
4त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत
आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत.
5विषारी#3:5 कटुता व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या
कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे.
6जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत
त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे.
7त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही;
त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.
8जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो,
तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.
9मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे.
त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.
10दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे,
लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे
11त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले
आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले.
12त्यांनी आपले धनुष्य ताणून
मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे.
13आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी
माझे अंतर्याम छेदले आहे.
14मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे;
ते दिवसभर माझ्या चेष्टेची गीते गातात.
15प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे,
आणि मला आंब प्यावयास दिली आहे.
16त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत.
त्यांनी मला धुळीत तुडविले आहे.
17माझी शांती हिरावून गेली आहे;
समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे.
18म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे
व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.”
19माझी पीडा व भटकंतीची,
विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते.
20ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे,
आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो.
21तरीपण आशेचा हा एक
किरण उरला आहे:
22याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही
कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.
23त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते;
तुमची विश्वसनीयता महान आहे.
24मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत;
म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.”
25जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात,
आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.
26याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे
हितकारक आहे.
27मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे
त्याच्या हितासाठी आहे.
28कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे
म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.
29त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे—
तरी आशा कायम असेल.
30जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा,
आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.
31कारण प्रभू कोणाचाही
कायमचा त्याग करत नाहीत.
32जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात,
त्यांची महान प्रेमदया अथांग आहे.
33ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत
व त्यांना दुखवित नाहीत.
34जगातील सर्व बंदिवानांना
पायाखाली तुडवून चिरडणे,
35परमोच्चांनी दिलेले हक्क
त्यांच्यापासून हिरावून घेणे,
36कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे—
या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय?
37प्रभूने परवानगी दिल्याशिवाय
बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे?
38अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही
परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय?
39आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते,
तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?
40आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ,
आणि परत याहवेहकडे वळू.
41आपण स्वर्गातील परमेश्वराकडे
आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू:
42आम्ही पाप केले आणि बंड केले
आणि तुम्ही त्याची क्षमा केली नाही.
43“तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला;
तुम्ही निर्दयपणे संहार केला.
44तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे
जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये.
45तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा
गाळ व उकिरडा केले आहे.
46“सर्व शत्रूंनी आपले मुख
आमच्याविरुद्ध खूप रुंद उघडले आहे.
47आम्ही दहशत व जोखिम,
विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.”
48माझ्या लोकांच्या विनाशामुळे
माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत.
49माझे डोळे अखंडपणे,
न थांबता, अश्रुपात करीत राहतील,
50याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून
पाहीपर्यंत ते वाहत राहतील.
51माझ्या नगरातील स्त्रियांना बघून
माझे अंतःकरण पीडित होत आहे.
52जे विनाकारण माझे शत्रू बनले होते,
त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे.
53त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला
आणि माझ्यावर दगडमार केला;
54पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले,
आणि मला वाटले की आता माझा नाश होणार.
55याहवेह, त्या खोल डोहातून
मी तुमच्या नावाचा धावा केला,
56तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे
तुम्ही दुर्लक्ष करू नका.”
57मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले
आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”
58हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला;
तुम्ही माझ्या जीवनाची खंडणी दिली.
59याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे.
तुम्हीच माझी बाजू उचलून धरा!
60तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता,
त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे.
61याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत,
त्यांनी रचलेले सर्व कारस्थान—
62माझे शत्रू माझ्याविरुद्ध दिवसभर
काय बोलतात व काय कुजबुजतात, हे सर्व तुम्ही ऐकले आहे.
63त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून,
ते माझ्या उपहासाची गाणी गातात.
64हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल
ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या.
65त्यांच्या हृदयावर आवरण टाका,
तुमचा शाप त्यांच्यावर पडो!
66क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि
याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा.

सध्या निवडलेले:

विलापगीत 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन