यहोशवा 5:1-9
यहोशवा 5:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले. त्या वेळी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.” त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून इस्राएल लोकांची सुंता अरालोथ हे नाव दिलेल्या टेकडीजवळ केली. यहोशवाने त्यांची सुंता केली याचे कारण हे की, युद्धास लायक असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते. मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती; कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करीत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास लायक अशा पुरुषांनी परमेश्वराची वाणी न ऐकल्यामुळे, त्या काळात त्यांचा नाश झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथ देऊन सांगितले होते की, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहतात असा जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला होता, तो देश मी तुमच्या नजरेस पडू देणार नाही. त्यांच्या जागी त्यांची जी मुले देवाने वाढविली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ते बेसुनत राहिले होते. सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी आपल्याद्वारे दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल म्हणतात.
यहोशवा 5:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही. त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.” तेव्हा यहोशुआने गारगोटीच्या सुर्या तयार केल्या आणि गिबियाथ हारालोथ या ठिकाणी इस्राएली लोकांची सुंता केली. यहोशुआने सुंता यासाठी केली की: इजिप्त देश सोडून जे सर्व बाहेर आले—युद्धाचे वय असलेले सर्व पुरुष—इजिप्त सोडून येत असताना रानामध्ये मरण पावले. बाहेर पडलेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, परंतु इजिप्त सोडल्यानंतरच्या प्रवासाच्या काळात जे सर्व पुरुष जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती. इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही. म्हणून जी मुले आपल्या वडिलांची जागा घेण्यायोग्य झाली होती, यहोशुआने त्यांची सुंता केली. ते अजूनही बेसुंती होते कारण वाटेत त्यांची सुंता झाली नव्हती सुंतेच्या विधीनंतर जखमा बर्या होईपर्यंत संपूर्ण इस्राएली राष्ट्राने छावणीत विश्रांती घेतली. मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुमच्यापासून इजिप्तचा कलंक दूर लोटून दिला आहे,” यास्तव त्या ठिकाणाला गिलगाल असे नाव देण्यात आले आणि आज देखील ते ठिकाण त्याच नावाने ओळखले जाते.
यहोशवा 5:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देनेपलीकडील अमोर्यांच्या सर्व राजांनी व समुद्र-किनार्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही. त्या वेळेस परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुर्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.” त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुर्या बनवून गिबअथ हा-अरालोथ2 येथे इस्राएल लोकांची सुंता केली. यहोशवाने त्यांची सुंता केली ह्याचे कारण हे की, युद्धास पात्र असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते. मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती; कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे, ह्या काळात त्यांचा संहार झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही. त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ती बेसुनतच राहिली होती. सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे.” म्हणून आजही त्या जागेला गिलगाल (लोटून देणे) म्हणतात.