यहोशवा 24:1-13
यहोशवा 24:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमात एकवट करून इस्राएलाचे वडील व त्याचे पुढारी व त्याचे न्यायाधीश व त्यावरले अधिकारी यांस बोलावले, आणि ते देवापुढे हजर झाले. तेव्हा यहोशवाने सर्व लोकांस सांगितले, “इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो की, पूर्वकाळी तुमचे पूर्वज फरात महानदी पलीकडे राहत होते; अब्राहामाचा पिता व नाहोराचा पिता तेरह तेथे होता; तेव्हा त्यांनी दुसऱ्या देवाची सेवा केली. परंतु त्याने तुमचा पूर्वज अब्राहाम ह्याला महानदीच्या पलीकडून आणले, आणि त्यास कनान देशात नेले आणि तेव्हा मी त्यास इसहाकाद्वारे पुष्कळ वंशज दिले, आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रांसह मिसर देशी गेला. मग मी मोशे व अहरोन यांना पाठवले आणि मिसऱ्यांना पीडा देऊन पीडिले, नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. तेव्हा मी तुमच्या पूर्वजांस मिसर देशातून बाहेर आणले आणि तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला, तेव्हा मिसरी, रथ व घोडे घेऊन, तांबड्या समुद्रापर्यंत त्यांच्या पाठीस लागले. तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्ये काळोख पाडला, आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना बुडवले; मी मिसरात जे केले, ते तर तुमच्या डोळ्यांनी पाहिले, आणि मग तुझी रानात बहुत दिवस राहिला. मग जे अमोरी यार्देनेच्या पलीकडे राहत होते, त्यांच्या देशात मी तुम्हाला आणले; तेव्हा त्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले, आणि तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला; मी त्यांचा तुमच्यापुढे नाश केला. नंतर मवाबाचा राजा सिप्पोरपुत्र बालाक त्याने उठून इस्राएलाशी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बौराचा पुत्र बलाम याला तुम्हाला शाप देण्यासाठी बोलावले. परंतु बलामाचे मी ऐकले नाही; यास्तव त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला, आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडवले. मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे मालक, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, ह्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले; मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवल्या, आणि त्यांनी त्यांना तुमच्यासमोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांना घालवले; तुझ्या तलवारीने व धनुष्यानेही हे झाले नाही. याप्रमाणे ज्या देशाविषयी तुम्ही श्रम केले नाहीत, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत, ती मी तुम्हाला दिली आहेत, तुम्ही त्यामध्ये राहत आहा; द्राक्षमळे व जैतूनबने जी तुम्ही लावली नाहीत, त्यांचे तुम्ही फळ खात आहात.
यहोशवा 24:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर यहोशुआने इस्राएलांच्या सर्व गोत्रांना शेखेम येथे एकत्र केले. त्याने इस्राएलचे वडीलजन, पुढारी, न्यायाधीश व सर्व अधिकाऱ्यांना बोलाविले आणि त्या सर्वांनी स्वतःस परमेश्वरासमोर सादर केले. यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘फार पूर्वी तुमचे पूर्वज, अब्राहाम व नाहोराचा पिता तेरह, फरात नदीच्या पलीकडे राहत होते आणि ते इतर दैवतांची भक्ती करीत होते. परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला, आणि इसहाकाला याकोब आणि एसाव हे दिले. एसावाला मी सेईरचा डोंगराळ प्रदेश वतन करून दिला, परंतु याकोब आणि त्याचे कुटुंब इजिप्त देशास गेले. “ ‘नंतर मी मोशे आणि अहरोनला पाठविले आणि मी तिथे जे केले त्यामुळे इजिप्तच्या लोकांवर पीडा आल्या आणि मी तुम्हाला बाहेर आणले. जेव्हा मी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा तुम्ही समुद्राजवळ आला आणि इजिप्तच्या लोकांनी रथ आणि घोडेस्वार घेऊन तांबड्या समुद्रापर्यंत तुमचा पाठलाग केला. त्यांनी साहाय्यासाठी याहवेहचा (म्हणजे माझा) धावा केला आणि मी तुमच्या व इजिप्तच्या लोकांमध्ये अंधार केला, समुद्र इजिप्तच्या लोकांवर आणला आणि त्यात त्यांना बुडवून टाकले. मी इजिप्तच्या लोकांचे काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यानंतर तुम्ही पुष्कळ काळ अरण्यात राहिला. “ ‘यार्देनेच्या पूर्वेकडे राहणार्या अमोर्यांच्या देशात मी तुम्हाला आणले. ते तुमच्याविरुद्ध लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. तुमच्यापुढे त्यांचा नाश केला आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. जेव्हा सिप्पोरचा पुत्र, मोआबाचा राजा बालाकाने इस्राएलविरुद्ध युद्धाची तयारी केली आणि तुम्हाला शाप देण्यासाठी बौराचा पुत्र बलामाला पाठविले. परंतु मी बलामाचे ऐकले नाही आणि त्याने तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा आशीर्वाद दिला आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले. “ ‘नंतर तुम्ही यार्देन नदी ओलांडून यरीहोकडे आला. यरीहोचे रहिवासी तुमच्याविरुद्ध लढले, तसेच अमोरी, परिज्जी, कनानी, हिथी, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी हे सुद्धा लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठविल्या व त्यांनी त्यांना व दोन अमोरी राजांना तुमच्यापुढून घालवून दिले. हे तुमच्या तलवारीने आणि धनुष्य बाणांनी केले नाही. म्हणून ज्या भूमीवर तुम्ही कष्ट केले नाहीत अशी भूमी आणि जी शहरे तुम्ही बांधली नाहीत ती मी तुम्हाला दिली; आणि तुम्ही त्यात राहता आणि जे तुम्ही लावले नाही त्या द्राक्षमळ्यातून व जैतुनाच्या बागेतून फळे खाता.’
यहोशवा 24:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर यहोशवाने इस्राएलाच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्राएलाचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले; आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहाम व नाहोर ह्यांचा बाप तेरह हे फरात महानदीपलीकडे राहत व अन्य देवांची सेवा करत. तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला. मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले, आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला; याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला. नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले; नंतर मी तुम्हांला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून काढून आणले; मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला आणि मिसरी लोकांनी रथ व स्वार ह्यांसह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिसर्यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिलात. मग मी तुम्हांला यार्देनेच्या पूर्वेस राहणार्या अमोरी लोकांच्या देशात आणले; ते तुमच्याशी लढले; मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला; तुमच्यापुढून मी त्यांचा संहार केला. नंतर मवाबाचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्राएलाशी युद्ध केले; तुम्हांला शाप देण्यासाठी त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले; पण मी बलामाचे ऐकायला तयार नव्हतो म्हणून त्याने तुम्हांला उलट आशीर्वाद दिला; अशा प्रकारे मी तुम्हांला त्याच्या हातातून सोडवले. तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीस गांधीलमाशा पाठवल्या व त्यांनी अमोर्यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले; मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हांला दिली; जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यांत तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनांचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात.