तेव्हा यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमात एकवट करून इस्राएलाचे वडील व त्याचे पुढारी व त्याचे न्यायाधीश व त्यावरले अधिकारी यांस बोलावले, आणि ते देवापुढे हजर झाले. तेव्हा यहोशवाने सर्व लोकांस सांगितले, “इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो की, पूर्वकाळी तुमचे पूर्वज फरात महानदी पलीकडे राहत होते; अब्राहामाचा पिता व नाहोराचा पिता तेरह तेथे होता; तेव्हा त्यांनी दुसऱ्या देवाची सेवा केली. परंतु त्याने तुमचा पूर्वज अब्राहाम ह्याला महानदीच्या पलीकडून आणले, आणि त्यास कनान देशात नेले आणि तेव्हा मी त्यास इसहाकाद्वारे पुष्कळ वंशज दिले, आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रांसह मिसर देशी गेला. मग मी मोशे व अहरोन यांना पाठवले आणि मिसऱ्यांना पीडा देऊन पीडिले, नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. तेव्हा मी तुमच्या पूर्वजांस मिसर देशातून बाहेर आणले आणि तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला, तेव्हा मिसरी, रथ व घोडे घेऊन, तांबड्या समुद्रापर्यंत त्यांच्या पाठीस लागले. तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्ये काळोख पाडला, आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना बुडवले; मी मिसरात जे केले, ते तर तुमच्या डोळ्यांनी पाहिले, आणि मग तुझी रानात बहुत दिवस राहिला. मग जे अमोरी यार्देनेच्या पलीकडे राहत होते, त्यांच्या देशात मी तुम्हाला आणले; तेव्हा त्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले, आणि तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला; मी त्यांचा तुमच्यापुढे नाश केला. नंतर मवाबाचा राजा सिप्पोरपुत्र बालाक त्याने उठून इस्राएलाशी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बौराचा पुत्र बलाम याला तुम्हाला शाप देण्यासाठी बोलावले. परंतु बलामाचे मी ऐकले नाही; यास्तव त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला, आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडवले. मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे मालक, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, ह्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले; मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवल्या, आणि त्यांनी त्यांना तुमच्यासमोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांना घालवले; तुझ्या तलवारीने व धनुष्यानेही हे झाले नाही. याप्रमाणे ज्या देशाविषयी तुम्ही श्रम केले नाहीत, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत, ती मी तुम्हाला दिली आहेत, तुम्ही त्यामध्ये राहत आहा; द्राक्षमळे व जैतूनबने जी तुम्ही लावली नाहीत, त्यांचे तुम्ही फळ खात आहात.