YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 10:7-14

यहोशवा 10:7-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.” परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.” यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले. ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.” तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापुर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.

सामायिक करा
यहोशवा 10 वाचा

यहोशवा 10:7-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

लगेच यहोशुआ आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांसह सर्व सैन्य घेऊन गिलगालहून निघाला. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “त्यांना भिऊ नकोस; मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. त्यांच्यातील कोणीही तुझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही.” गिलगालहून रात्रभर प्रवास केल्यानंतर, यहोशुआने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मग याहवेहने इस्राएली समोर शत्रू सैन्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि यहोशुआ व इस्राएलांच्या सैन्याने गिबोनाजवळ पूर्णपणे त्यांचा पराभव केला. इस्राएली लोकांनी वर बेथ-होरोनकडे जाणार्‍या वाटेपर्यंत त्यांचा पाठलाग केला व अजेकाह व मक्केदापर्यंत त्यांना मारत आले. ते इस्राएल पुढून बेथ-होरोन पासून अजेकाहच्या वाटेवरून पळून जात असताना, याहवेहने त्यांच्यावर गारांच्या प्रचंड वर्षाव केला आणि इस्राएली लोकांच्या तलवारीपेक्षा गारांनीच अधिक लोक मारले गेले. ज्या दिवशी याहवेहने अमोरी लोकांना इस्राएली लोकांच्या हाती दिले, तेव्हा इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआ याहवेहना म्हणाला: “सूर्या, गिबोनावर स्थिर उभा हो, आणि हे चंद्रा, तू अय्यालोनच्या खोर्‍यावर स्तब्ध राहा” तेव्हा इस्राएली राष्ट्राने आपल्या शत्रूंचा सूड घेईपर्यंत सूर्य स्थिर उभा राहिला, आणि चंद्र स्तब्ध झाला. जसे याशारच्या ग्रंथात लिहिलेले आहे. सूर्य संपूर्ण दिवसभर आकाशात मध्यभागी स्थिर राहिला आणि त्याने अस्त होण्यास विलंब केला. असा दिवस यापूर्वी कधीही आला नव्हता आणि त्यानंतरही कधी आला नाही. त्या दिवशी, याहवेहने एका मनुष्याचा शब्द ऐकला. कारण याहवेह निश्चितच इस्राएलसाठी लढत होते!

सामायिक करा
यहोशवा 10 वाचा

यहोशवा 10:7-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर ह्यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.” यहोशवा रातोरात गिलगालाहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला. परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले. ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले. परमेश्वराने अमोर्‍यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्‍यावर स्थिर हो.” तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.

सामायिक करा
यहोशवा 10 वाचा