YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 10:7-14

यहोशुआ 10:7-14 MRCV

लगेच यहोशुआ आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांसह सर्व सैन्य घेऊन गिलगालहून निघाला. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “त्यांना भिऊ नकोस; मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. त्यांच्यातील कोणीही तुझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही.” गिलगालहून रात्रभर प्रवास केल्यानंतर, यहोशुआने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मग याहवेहने इस्राएली समोर शत्रू सैन्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि यहोशुआ व इस्राएलांच्या सैन्याने गिबोनाजवळ पूर्णपणे त्यांचा पराभव केला. इस्राएली लोकांनी वर बेथ-होरोनकडे जाणार्‍या वाटेपर्यंत त्यांचा पाठलाग केला व अजेकाह व मक्केदापर्यंत त्यांना मारत आले. ते इस्राएल पुढून बेथ-होरोन पासून अजेकाहच्या वाटेवरून पळून जात असताना, याहवेहने त्यांच्यावर गारांच्या प्रचंड वर्षाव केला आणि इस्राएली लोकांच्या तलवारीपेक्षा गारांनीच अधिक लोक मारले गेले. ज्या दिवशी याहवेहने अमोरी लोकांना इस्राएली लोकांच्या हाती दिले, तेव्हा इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआ याहवेहना म्हणाला: “सूर्या, गिबोनावर स्थिर उभा हो, आणि हे चंद्रा, तू अय्यालोनच्या खोर्‍यावर स्तब्ध राहा” तेव्हा इस्राएली राष्ट्राने आपल्या शत्रूंचा सूड घेईपर्यंत सूर्य स्थिर उभा राहिला, आणि चंद्र स्तब्ध झाला. जसे याशारच्या ग्रंथात लिहिलेले आहे. सूर्य संपूर्ण दिवसभर आकाशात मध्यभागी स्थिर राहिला आणि त्याने अस्त होण्यास विलंब केला. असा दिवस यापूर्वी कधीही आला नव्हता आणि त्यानंतरही कधी आला नाही. त्या दिवशी, याहवेहने एका मनुष्याचा शब्द ऐकला. कारण याहवेह निश्चितच इस्राएलसाठी लढत होते!

यहोशुआ 10 वाचा