YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 38:1-18

ईयोब 38:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला, कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द? आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे. मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे. जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग? मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का? तीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली? जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला. जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला? त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले. मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले. मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील. तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का? तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का? पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे आणि त्यांचा उंच भूज मोडला आहे. सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का? मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का? ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.

सामायिक करा
ईयोब 38 वाचा

ईयोब 38:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला, “अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण? आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला हे विचारतो; मला सांग. मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. तिचे मोजमाप कोणी ठरवले बरे? तिला मापनसूत्र कोणी लावले? हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसवली? त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले. व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला. समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला? त्या समयी मी त्याला मेघवस्त्राचे पांघरूण घातले, दाट अभ्रांचे त्याला बाळंते केले; मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्याला अडसर व दरवाजे लावले; आणि मी म्हणालो, ‘तू येथवरच ये; ह्यापलीकडे तू येता कामा नये; येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत.’ तू जन्मात कधी प्रातःसमयाचे नियमन केले आहेस काय? प्रभातेला आपले स्थान दाखवून दिले आहेस काय? ह्यासाठी की त्याने पृथ्वीच्या दिगंतास धरून तिच्यावरील दुष्टांना झटकून टाकावे; तेव्हा मुद्रेच्या ठशाने जसा मातीला आकार येतो, तसा प्रभातेने पृथ्वीचा आकार व्यक्त होतो; सर्व वस्तू जशा काय त्याच्या पेहरावाप्रमाणे ठळक दिसतात. दुष्टांकडून त्यांचा प्रकाश काढून घेतला जाईल; त्यांचा उगारलेला हात मोडतो. समुद्राच्या झर्‍यापर्यंत तुझा कधी रिघाव झाला आहे काय? सागराच्या खोल प्रदेशी तू कधी भ्रमण केले आहेस काय? मृत्यूची द्वारे तुला प्रकट झाली आहेत काय? तू अधोलोकाची द्वारे पाहिली आहेत काय? पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय? तुला हे सर्व ठाऊक असेल तर सांग.

सामायिक करा
ईयोब 38 वाचा