YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 1:1-22

ईयोब 1:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ऊस देशात एक पुरूष राहत होता त्याचे नाव ईयोब होते, तो सात्वीक व सरळ होता, तो देवाचा आदर करीत असे व वाईटापासून दूर राही. ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता. प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करावयास त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत. जेव्हा भोजनसमारंभाचे दिवस पूर्ण झाल्यावर, ईयोब त्यांना बोलवून त्यांची देवासाठी पुन्हा शुद्धी करी. तो मोठ्या पहाटेस लवकर ऊठे आणि त्याच्या प्रत्येक मुलासाठी होमार्पण करीत असे, तो म्हणत असे, “कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि त्यांच्या मनात देवाचा तिरस्कार केला असेल.” ह्याप्रमाणे ईयोब नित्य करीत असे. एक दिवस असा आला कि त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही तेथे आला. परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि तिच्यावर खाली-वर चालत जाऊन आलो आहे.” परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोब याच्याकडे लक्ष दिलेस काय? पृथ्वीत त्याच्यासारखा सरळ आणि सात्विक, देवभिरू व दुष्टतेपासून दूर राहणारा असा कोणीही मनुष्य नाही.” नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “ईयोब देवाचे भय ऊगीच बाळगतो काय? तू त्याच्या भोवती, त्याच्या घरासभोवती, आणि त्याच्या सर्वस्वाच्या प्रत्येक बाजूस कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हातांच्या कामांस यश दिले आहेस, आणि भूमीत त्याचे धन वाढत आहे. पण जर तू आपला हात पुढे करून त्याच्याजवळ असणाऱ्या सर्वस्वावर टाकशील तर तो आत्ताच तुझ्या तोंडावर तुझा त्याग करील.” परमेश्वर सैतानास म्हणाला, “पाहा, त्याचे सर्व जे काही आहे ते तुझ्या अधिकारात आहे, फक्त त्यास तुझ्या हाताचा स्पर्श करू नको.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला. एक दिवस असा आला की, जेव्हा त्याची मुले आणि त्याच्या मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात जेवत होते व द्राक्षरस पीत होते. तेव्हा एक निरोप्या ईयोबाकडे आला आणि म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि त्यांच्याबाजुस गाढवी चरत होत्या, शबाई लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना घेवून गेले. खरोखर, त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, हे तुला सांगण्यासाठी मीच निभावून आलो आहे.” पहिला हे सांगत असतांनाच दुसरा आला आणि म्हणाला, “आकाशातून दैवी अग्नीचा वर्षाव झाल्यामुळे मेंढरे आणि चाकर जळून गेले, आणि मीच तेवढा बचावून तुला सांगायला आलो आहे.” तो बोलत असतांनाच, आणखी दुसरा आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून, त्यांनी उंटावर हल्ला केला, आणि ते त्यांना घेवून गेले. होय, आणि त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, आणि हे तुला सांगावयास मीच निभावून आलो आहे.” आत्तापर्यंत तो हे सांगत असतांनाच, आणखी एक आला आणि म्हणाला, “तुझी मुले आणि मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात खात होते व द्राक्षरस पीत होते. तेव्हा रानाकडून वादळी वारे आले आणि त्या घराच्या चार कोपऱ्यास धडकले, आणि ते त्या तरूणावर पडले आणि ते मरण पावले, केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगण्यास इथे आलो.” तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली. तो म्हणाला, “मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले, व परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो.” या सर्व स्थितीतही, ईयोबाकडून पाप घडले नाही, देवाने चूक केली आहे असे काही तो मुर्खासारखा बोलला नाही.

सामायिक करा
ईयोब 1 वाचा

ईयोब 1:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव ईयोब असे होते; तो सात्त्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही. त्याला सात पुत्र व तीन कन्या झाल्या. सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजनसमारंभ करीत, व त्या वेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावीत. हे भोजनसमारंभ आटोपल्यावर ईयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी; तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलींचे हवन करी; कारण तो म्हणे की, “न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल.” असा ईयोबाचा नित्यक्रम असे. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले, व त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू आता कोठून आलास?” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडूनफिरून आलो आहे.” परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की, “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो; त्याला मात्र हात लावू नकोस.” मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. एके दिवशी असे झाले की, ईयोबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत असता, एका जासुदाने ईयोबाकडे येऊन सांगितले, “बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या. तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले; हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलो आहे.” तो हे सांगत आहे इतक्यात दुसर्‍या एकाने येऊन सांगितले, “दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला; त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले; हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.” तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून उंटांवर घाला घातला व ते ते घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले, हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.” तो सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, “तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत होती, तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वार्‍याच्या सोसाट्याने त्या घराचे चार्‍ही कोपरे हादरले; त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली; हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.” मग ईयोबाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!” ह्या सर्व प्रसंगांत ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.

सामायिक करा
ईयोब 1 वाचा