YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 8:24-47

योहान 8:24-47 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

म्हणून मी तुम्हांला सांगितले की, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहे1 असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुम्ही कोण आहात?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला जे सांगत आलो तेच नाही का?2 मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे; परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो.” तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही. म्हणून येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो.” तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात; तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” ते त्याला म्हणाले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो; तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदासर्वदा राहत नाही, पुत्र सदासर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही; म्हणून तुम्ही मला जिवे मारायला पाहता. मी माझ्या पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता.” त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाची मुले आहात तर अब्राहामाची कृत्ये करा;1 परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे मारायला पाहता; अब्राहामाने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “आमचा जन्म जारकर्मापासून झाला नाही. आम्हांला एकच पिता म्हणजे देव आहे.” येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. पण मी तुम्हांला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो; तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”

सामायिक करा
योहान 8 वाचा

योहान 8:24-47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.” यावरुन ते त्यास म्हणाले, “तू कोण आहेस?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हास जे सांगत आलो तेच नाही का? मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो.” तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हास हे कळेल की तो मी आहे आणि मी स्वतः काही करीत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो. ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्यास आवडणार्‍या गोष्टी करतो.” येशू हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.” त्यांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की, तुम्ही स्वतंत्र केले जाल?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत. म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल. मी जाणतो की, तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता.” त्यांनी त्यास उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही अब्राहामाची मुले आहात तर अब्राहामाची कृत्ये कराल. परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्यास म्हणजे मला तुम्ही आता ठार मारायला पाहता. अब्राहामाने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याच्या कृत्ये करता.” ते त्यास म्हणाले, “आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे.” येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो, मी स्वतः होऊन आलो नाही, पण त्याने मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की, तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे. पण मी तुम्हास खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही? देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”

सामायिक करा
योहान 8 वाचा

योहान 8:24-47 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.” त्यांनी विचारले, “तर मग आपण कोण आहात?” येशूंनी उत्तर दिले, “मी प्रारंभापासून तुम्हाला सांगत आलो आहे, मला तुमच्या बाबत बरेच काही बोलायचे आहे आणि न्याय करायचे आहे. परंतु ज्याने मला पाठविले, तो विश्वसनीय आहे आणि जे मी त्याच्यापासून ऐकले आहे, तेच जगाला सांगतो.” परंतु ते त्यांच्याशी पित्यासंबंधी बोलत होते, हे त्यांना अद्यापि उमगले नव्हते. म्हणून येशू म्हणाले, “जेव्हा तुम्ही मानवपुत्राला उंच कराल, तेव्हाच मी तो आहे आणि मी स्वतःहून काही करत नाही तर पित्याने मला ज्या गोष्टी शिकविल्या, त्याच बोलतो हे तुम्हाला समजेल. ज्याने मला पाठविले; तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण त्याला जे आवडते ते मी नेहमी करत असतो.” हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ज्या यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे. आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तेथे सदासर्वदा राहतो. म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल. मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही. मी पित्याच्या समक्षतेत असताना जे पाहिले, तेच मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही मात्र तुमच्या पित्यापासून जे काही ऐकले त्याप्रमाणे करता.” त्यांनी उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” येशू म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाची लेकरे असता, तर तुम्ही अब्राहामाची कृत्ये केली असती. परंतु त्याऐवजी परमेश्वराकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले म्हणून तुम्ही मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहात, अब्राहामाने असे कृत्य कधीही केले नव्हते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पित्याची कामे करीत आहात.” तेव्हा ते विरोध करीत म्हणाले, “आम्ही बेवारस संतती नाही, आमचा खरा पिता प्रत्यक्ष परमेश्वरच आहे.” येशूंनी त्यांना सांगितले, “परमेश्वर तुमचा पिता असता, तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी परमेश्वरापासून आलो आहे. मी स्वतः होऊन आलो नाही; परमेश्वराने मला पाठविले आहे. मी म्हणतो ते तुम्हाला समजत नाही कारण ते तुम्ही ऐकू इच्छित नाही. तुम्ही तुमचा पिता, सैतान, याच्यापासून आहात आणि आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घातक, व सत्याला धरून न राहणारा, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे. पण मी सत्य सांगतो तर, तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही! मी पापी आहे हे तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकेल का? जर मी सत्य सांगतो, तर मजवर विश्वास का ठेवीत नाही? जो कोणी परमेश्वरापासून आहे तो परमेश्वराचे शब्द ऐकतो. तुम्ही त्याचे ऐकत नाही याचे कारण हेच की तुम्ही परमेश्वराचे नाही.”

सामायिक करा
योहान 8 वाचा

योहान 8:24-47 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्यामुळे मी तुम्हांला सांगितले, तुम्ही तुमच्या पापांत मराल कारण मी जो आहे, तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही तुमच्या पापांत मराल.” त्यांनी त्याला विचारले, “तुम्ही कोण आहात?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे. मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे. ज्याने मला पाठवले तो सत्य आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्याच मी जगापुढे जाहीर करतो.” तो आपल्याशी पित्याविषयी बोलत आहे, हे त्यांना समजले नाही. म्हणून येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, तेव्हा तुम्हांला कळेल की, मी तो आहे. मी स्वतःच्या अधिकाराने काही करत नाही. तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले, तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही; कारण जे त्याला आवडते, ते मी नेहमी करतो.” ह्या गोष्टी बोलत असताना पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्ही अब्राहामचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या गुलामगिरीत नव्हतो, तर ‘तुम्ही बंधमुक्त व्हाल’, असे कसे म्हणता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी पाप करतो, तो पापाचा गुलाम असतो. गुलाम घरात सदासर्वदा राहत नाही परंतु पुत्र सदासर्वदा राहतो. म्हणून जर पुत्राने तुम्हांला बंधमुक्त केले, तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही अब्राहामचे वंशज आहात, हे मला ठाऊक आहे. तरीही तुमच्यात माझ्या वचनाला स्थान नाही म्हणून तुम्ही मला ठार मारायला पाहता. माझ्या पित्याजवळ मी जे पाहिले आहे, त्याविषयी मी बोलतो, परंतु तुमच्या पित्याजवळ तुम्ही जे पाहिले आहे, त्याप्रमाणे तुम्ही करता.” त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खरोखर अब्राहामची मुले असता, तर तुम्ही अब्राहामने केली तशी कृत्ये केली असती. मी देवाकडून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले तरीही मला तुम्ही आता ठार मारायला पाहता, अब्राहामने असे केले नाही! तुम्ही तुमच्या बापाची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर स्वतः आमचा पिता आहे. आम्ही त्याची खरी मुले आहोत.” येशूने त्यांना म्हटले, “परमेश्वर जर तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवाकडून आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्याने मला पाठवले आहे. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुम्हांला माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून जन्मला आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यापुढे टिकला नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलतो; कारण तो लबाड असून सर्व असत्याचा बाप आहे. पण मी तुम्हांला खरे ते सांगतो तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी कोण मला पापांबद्दल दोषी ठरवू शकतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? जो देवाकडचा आहे तो देवाची वचने ऐकतो, परंतु तुम्ही देवाकडचे नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही?”

सामायिक करा
योहान 8 वाचा