मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.”
त्यांनी विचारले, “तर मग आपण कोण आहात?”
येशूंनी उत्तर दिले, “मी प्रारंभापासून तुम्हाला सांगत आलो आहे, मला तुमच्या बाबत बरेच काही बोलायचे आहे आणि न्याय करायचे आहे. परंतु ज्याने मला पाठविले, तो विश्वसनीय आहे आणि जे मी त्याच्यापासून ऐकले आहे, तेच जगाला सांगतो.”
परंतु ते त्यांच्याशी पित्यासंबंधी बोलत होते, हे त्यांना अद्यापि उमगले नव्हते. म्हणून येशू म्हणाले, “जेव्हा तुम्ही मानवपुत्राला उंच कराल, तेव्हाच मी तो आहे आणि मी स्वतःहून काही करत नाही तर पित्याने मला ज्या गोष्टी शिकविल्या, त्याच बोलतो हे तुम्हाला समजेल. ज्याने मला पाठविले; तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण त्याला जे आवडते ते मी नेहमी करत असतो.” हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
ज्या यहूदी पुढार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.”
त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?”
त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे. आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तेथे सदासर्वदा राहतो. म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल. मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही. मी पित्याच्या समक्षतेत असताना जे पाहिले, तेच मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही मात्र तुमच्या पित्यापासून जे काही ऐकले त्याप्रमाणे करता.”
त्यांनी उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.”
येशू म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाची लेकरे असता, तर तुम्ही अब्राहामाची कृत्ये केली असती. परंतु त्याऐवजी परमेश्वराकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले म्हणून तुम्ही मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहात, अब्राहामाने असे कृत्य कधीही केले नव्हते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पित्याची कामे करीत आहात.”
तेव्हा ते विरोध करीत म्हणाले, “आम्ही बेवारस संतती नाही, आमचा खरा पिता प्रत्यक्ष परमेश्वरच आहे.”
येशूंनी त्यांना सांगितले, “परमेश्वर तुमचा पिता असता, तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी परमेश्वरापासून आलो आहे. मी स्वतः होऊन आलो नाही; परमेश्वराने मला पाठविले आहे. मी म्हणतो ते तुम्हाला समजत नाही कारण ते तुम्ही ऐकू इच्छित नाही. तुम्ही तुमचा पिता, सैतान, याच्यापासून आहात आणि आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घातक, व सत्याला धरून न राहणारा, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे. पण मी सत्य सांगतो तर, तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही! मी पापी आहे हे तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकेल का? जर मी सत्य सांगतो, तर मजवर विश्वास का ठेवीत नाही? जो कोणी परमेश्वरापासून आहे तो परमेश्वराचे शब्द ऐकतो. तुम्ही त्याचे ऐकत नाही याचे कारण हेच की तुम्ही परमेश्वराचे नाही.”