YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 6:25-71

योहान 6:25-71 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्यास म्हणाले, “रब्बी, आपण इकडे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. नष्ट होणार्‍या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्‍या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “आम्ही देवाची कामे करावीत म्हणून काय करावे?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” म्हणून ते त्यास म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की ते बघून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.’ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही. कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.” “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. तेव्हा ते म्हणाले, “हा येशू योसेफाचा मुलगा नाही काय? याच्या पित्याला आणि आईला आम्ही ओळखतो. आता हा कसे म्हणतो, मी स्वर्गातून उतरलो आहे?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपआपल्यात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. जो देवापासून आहे त्याने पित्याला पाहिले आहे. त्याच्याशिवाय कोणी पित्याला पाहिले आहे असे नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले. पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” तेव्हा यहूद्यांनी आपआपल्यात वाद वाढवून म्हटले, “हा आम्हास आपला देह कसा खायला देऊ शकेल?” यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तोसुध्दा माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात या गोष्टी सांगितल्या. त्याच्या शिष्यांतील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, “हे वचन कठीण आहे; हे कोण ऐकून घेऊ शकतो?” आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याच्या पुत्राला तो आधी होता जेथे होता तेथे जर वर चढताना पाहाल तर? आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत” कारण कोण विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला कोण धरून देईल, हे येशू पहिल्यापासून जाणत होता. तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हास म्हणले की, कोणीही मनुष्य, त्यास पित्याने ते दिल्याशिवाय, तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” त्यानंतर, त्याच्या शिष्यांतले पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. तेव्हा येशू बाराजणांना म्हणाला, “तुमची पण जायची इच्छा आहे काय?” तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत. आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि जाणतो की, आपण देवाचे पवित्र पुरूष आपण आहात.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांना निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एकजण सैतान आहे.” हे त्याने शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्याविषयी म्हणले होते; कारण बारा जणांतला तो एक असून त्यास धरून देणार होता.

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:25-71 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ते त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर, त्यांना म्हणाले, “गुरुजी, आपण येथे कधी आला?” येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी चिन्हे केली, त्यामुळे नाही तर तुम्ही भाकरी खाल्या व तृप्त झाला म्हणूनच माझा शोध करीत आहात. नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर केला आहे.” त्यावर त्यांनी विचारले, “असे कोणते काम करावे की ज्याची अपेक्षा परमेश्वर आम्हाकडून करतात?” येशू म्हणाले, “परमेश्वराचे कार्य हेच आहे: ज्याने त्यांना पाठविले त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” त्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्याने त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’” येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्याने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे. ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.” ते म्हणाले, “स्वामी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.” त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मला प्रत्यक्ष पाहता तरी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. पिता जे सर्वजण मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही. कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे. कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.” मी, “स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” या त्यांच्या विधानामुळे यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?” हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका, ज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘ते सर्व परमेश्वराने शिकविलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून त्याच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो. जो परमेश्वरापासून आहे त्याच्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जे विश्वास ठेवतात त्याला सार्वकालिक जीवन मिळालेच आहे. मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले. परंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही. मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.” यास्तव यहूदी पुढारी आपसात तीव्र वाद करू लागले, “हा मनुष्य त्याचा देह आम्हास कसा खावयास देऊ शकेल?” येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही. जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे. जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो. मला पाठविणार्‍या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते ते प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.” येशूंनी हे शिक्षण कफर्णहूमात सभागृहामध्ये दिले. हे ऐकून, त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण म्हणाले, “ही शिकवण अवघड आहे. हे कोण स्वीकारू शकेल?” त्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का? तर मग मानवपुत्राला, जेथे ते पूर्वी होते तेथे वर चढून जाताना पाहाल! फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत. तरी, तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.” आपणावर कोण विश्वास ठेवतो व कोण आपला विश्वासघात करणार हे येशूंना सुरुवातीपासून माहीत होते. पुढे येशू म्हणाले, “यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की, पित्याने शक्य केल्याशिवाय कोणालाही माझ्याकडे येता येत नाही.” हे ऐकून त्यांचे अनेक शिष्य मागे फिरले व त्यांना अनुसरले नाहीत. येशू आपल्या बारा शिष्यांना म्हणाले, “तुम्ही सुद्धा सोडून जाणार नाही ना?” त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. आम्ही विश्वास ठेवला आहे आणि परमेश्वराचे पवित्र ते तुम्हीच आहात हे ओळखले आहे.” येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांस निवडून घेतले नव्हते काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे!” हे तर ते शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदा याच्यासंबंधात बोलले, कारण तो बारा शिष्यांपैकी एक असून, त्यांचा विश्वासघात करणार होता.

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:25-71 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरूजी, येथे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिलीत म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय.” म्हणून ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हांला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे; आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.” ‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,’ असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग, ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’ असे आता तो कसे म्हणतो?” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसांत कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही; जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” तेव्हा यहूदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही; जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय; तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही; ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर? आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुमच्यामध्ये कित्येक आहेत.” कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, “ह्याच कारणास्तव मी तुम्हांला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात.”1 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एक जण सैतान2 आहे.” हे तो शिमोन इस्कर्योत ह्याचा मुलगा यहूदा ह्याच्याविषयी बोलला, कारण तो बारा जणांपैकी एक असून त्याला धरून देणार होता.

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:25-71 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरुवर्य, येथे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला निक्षून सांगतो, तुम्हांला माझ्या चिन्हांचा अर्थ समजला म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून तुम्ही माझा शोध घेता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर शाश्वत जीवनासाठी, टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. ते मनुष्याचा पुत्र तुम्हांला देईल; कारण परमेश्वर पित्याने त्याच्यावर मान्यतेचा शिक्का मारला आहे.” ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “देवाची कार्ये आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे कार्य हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की, जे पाहून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला. असे लिहिले आहे: ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खायला दिली.’” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तो परमेश्वराची भाकर आहे.” ते त्याला म्हणाले, “प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो, त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही, असे मी तुम्हांला सांगितले. ज्याला पिता माझ्याकडे सोपवतो, असा प्रत्येक जण माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो, त्याचा मी मुळीच अव्हेर करणार नाही. कारण स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले, त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व माझ्या स्वाधीन केले आहेत त्यांतून मी कुणालाही गमावू नये, तर शेवटच्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे. जे कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना शाश्वत जीवन प्राप्त व्हावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवावे ही माझ्या पित्याची इच्छा आहे.” ‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे’, असे तो म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “हा योसेफचा मुलगा येशू आहे ना? ह्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत, तर मग ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’, असे हा कसे काय म्हणतो?” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले, त्या पित्याने ओढून घेतल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि अशा माणसाला शेवटच्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो पित्याचे ऐकून शिकला आहे, तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, मात्र जो देवाकडचा आहे त्याने पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला ठामपणे सांगतो, जो विश्वास ठेवतो, त्याला शाश्वत जीवन मिळते. मी स्वतः जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला परंतु ते मरण पावले. मात्र स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्‍ली, तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी स्वतः आहे, ही भाकर जो कोणी खाईल, तो सर्व काळ जगेल, जी भाकर मी देईन, ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” हे ऐकून यहुदी आपसात वाद घालू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, तुम्ही जोवर मनुष्याच्या पुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्‍त पीत नाही, तोवर तुम्हांला जीवन मिळणार नाही. जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, त्याला शाश्वत जीवन लाभले आहे आणि मी स्वतः त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. माझा देह खरे अन्न आहे व माझे रक्‍त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो, तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर ती हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्‍ली, तरी ते मरण पावले. हे मात्र तसे नाही. ही भाकर जो खातो, तो सर्वकाळ जगेल.” कफर्णहूम येथील सभास्थानात शिकवण देत असताना त्याने ह्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, “हे वचन फार कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” आपले शिष्य ह्याविषयी वितंडवाद करत आहेत, हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुमच्या मनात शंका दाटली आहे काय? मग मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता, तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहिले तर? आत्मा जीवन देणारा आहे, देहाचा काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन आहेत. तरी पण विश्वास ठेवत नाहीत, असे तुमच्यात कित्येक आहेत.” विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण, हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. पुढे तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हांला सांगितले की, पित्याने त्याला समर्थ केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.” ह्यामुळे त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याकडे आले नाहीत. म्हणूनच येशू बारा जणांना म्हणाला, “तुमचीही निघून जायची इच्छा आहे काय?” शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? शाश्वत जीवन देणारी वचने आपल्याजवळ आहेत. आणि आता आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो आपणच आहात.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यापैकी एक जण सैतान आहे.” हे शिमोन इस्कर्योतचा मुलगा यहुदा ह्याच्याविषयी तो बोलला, कारण तो बारा जणांपैकी एक होता व त्याचा विश्‍वासघात करणार होता.

सामायिक करा
योहान 6 वाचा