तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरुवर्य, येथे कधी आलात?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला निक्षून सांगतो, तुम्हांला माझ्या चिन्हांचा अर्थ समजला म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून तुम्ही माझा शोध घेता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर शाश्वत जीवनासाठी, टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. ते मनुष्याचा पुत्र तुम्हांला देईल; कारण परमेश्वर पित्याने त्याच्यावर मान्यतेचा शिक्का मारला आहे.”
ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “देवाची कार्ये आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे कार्य हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की, जे पाहून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला. असे लिहिले आहे: ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खायला दिली.’”
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तो परमेश्वराची भाकर आहे.”
ते त्याला म्हणाले, “प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या.”
येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो, त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही, असे मी तुम्हांला सांगितले. ज्याला पिता माझ्याकडे सोपवतो, असा प्रत्येक जण माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो, त्याचा मी मुळीच अव्हेर करणार नाही. कारण स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले, त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व माझ्या स्वाधीन केले आहेत त्यांतून मी कुणालाही गमावू नये, तर शेवटच्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे. जे कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना शाश्वत जीवन प्राप्त व्हावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवावे ही माझ्या पित्याची इच्छा आहे.”
‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे’, असे तो म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “हा योसेफचा मुलगा येशू आहे ना? ह्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत, तर मग ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’, असे हा कसे काय म्हणतो?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले, त्या पित्याने ओढून घेतल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि अशा माणसाला शेवटच्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो पित्याचे ऐकून शिकला आहे, तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, मात्र जो देवाकडचा आहे त्याने पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला ठामपणे सांगतो, जो विश्वास ठेवतो, त्याला शाश्वत जीवन मिळते. मी स्वतः जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला परंतु ते मरण पावले. मात्र स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्ली, तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी स्वतः आहे, ही भाकर जो कोणी खाईल, तो सर्व काळ जगेल, जी भाकर मी देईन, ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”
हे ऐकून यहुदी आपसात वाद घालू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?”
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, तुम्ही जोवर मनुष्याच्या पुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोवर तुम्हांला जीवन मिळणार नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला शाश्वत जीवन लाभले आहे आणि मी स्वतः त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. माझा देह खरे अन्न आहे व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो, तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर ती हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली, तरी ते मरण पावले. हे मात्र तसे नाही. ही भाकर जो खातो, तो सर्वकाळ जगेल.”
कफर्णहूम येथील सभास्थानात शिकवण देत असताना त्याने ह्या गोष्टी सांगितल्या.
त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, “हे वचन फार कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?”
आपले शिष्य ह्याविषयी वितंडवाद करत आहेत, हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुमच्या मनात शंका दाटली आहे काय? मग मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता, तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहिले तर? आत्मा जीवन देणारा आहे, देहाचा काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन आहेत. तरी पण विश्वास ठेवत नाहीत, असे तुमच्यात कित्येक आहेत.” विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण, हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. पुढे तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हांला सांगितले की, पित्याने त्याला समर्थ केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.”
ह्यामुळे त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याकडे आले नाहीत. म्हणूनच येशू बारा जणांना म्हणाला, “तुमचीही निघून जायची इच्छा आहे काय?”
शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? शाश्वत जीवन देणारी वचने आपल्याजवळ आहेत. आणि आता आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो आपणच आहात.”
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यापैकी एक जण सैतान आहे.” हे शिमोन इस्कर्योतचा मुलगा यहुदा ह्याच्याविषयी तो बोलला, कारण तो बारा जणांपैकी एक होता व त्याचा विश्वासघात करणार होता.