YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 6:1-14

योहान 6:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्‍या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला. आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते. फिलिप्पाने त्यास उत्तर दिले, “त्यांच्यातल्या प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी पुरणार नाहीत.” त्याच्या शिष्यांतला एकजण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यास म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी आणि दोन मासळ्या आहेत; परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले. येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.” मग जेवणार्‍यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे.”

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:1-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

काही वेळानंतर, येशू गालील समुद्रापलीकडे गेले. या समुद्राला तिबिर्याचा समुद्र, असेही म्हणत लोकांचा मोठा समुदाय त्यांच्यामागे चालला होता, कारण त्यांनी आजार्‍यांना चिन्हे करून बरे केलेले पाहिले होते. यानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले. यहूद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता. जेव्हा येशूंनी वर पाहिले, व एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत आहे असे त्यांना दिसले, ते फिलिप्पाला म्हणाले, “या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कोठे विकत मिळतील?” ते केवळ त्याची परीक्षा पाहत होते, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांनी मनात अगोदरच ठरविले होते. फिलिप्पाने उत्तर दिले, “प्रत्येकाला एक घास तरी खाण्याएवढे अन्न विकत आणण्यासाठी अर्ध्या वर्षाच्या मजुरीपेक्षा अधिक तरी लागेल!” मग शिमोन पेत्र जो येशूंचा शिष्य होता, त्याचा भाऊ आंद्रिया म्हणाला, “येथे एक मुलगा आहे त्याच्याजवळ जवाच्या पाच लहान भाकरी आणि दोन लहान मासे आहेत, परंतु त्या इतक्या लोकांना कशा काय पुरतील?” येशूंनी म्हटले, “लोकांना खाली गटागटाने बसावयास सांगा.” त्याठिकाणी भरपूर गवत होते, व ते खाली बसले. तेथे पुरुषांचीच संख्या जवळजवळ पाच हजार होती. मग येशूंनी भाकरी घेतल्या, आभार मानून, जे बसले होते त्यांना तृप्त होईपर्यंत हव्या तेवढ्या वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले. सर्वांनी भरपूर जेवण केल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “आता उरलेले तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.” मग त्यांनी उरलेले तुकडे गोळा केले, आणि जवाच्या पाच भाकरींपैकी जेवून उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या. येशूंनी हे चिन्ह केल्याचे पाहून लोक म्हणू लागले, “खरोखर, या जगात जो येणार होता तो संदेष्टा हाच आहे.”

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यानंतर येशू गालीलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत, हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.” त्याच्या शिष्यांपैकी एक जण, म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” मग जेवणार्‍यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:1-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्यानंतर येशू गालीलच्या म्हणजे तिबिर्या सरोवराच्या पलीकडे गेला. मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग गेला कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे, ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला होता. येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे लोकसमुदाय येत आहे असे पाहून, फिलिपला म्हणाला, “ह्यांना भोजन द्यायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिपने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले, तरी चांदीची दोनशे नाणी देऊन आणलेल्या भाकरीदेखील पुरणार नाहीत.” त्याच्या शिष्यांपैकी दुसरा एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासे आहेत. परंतु त्या इतक्या लोकांना कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते म्हणून सर्व लोक बसले. तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. त्याने केलेले हे चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे, तो खरोखर हा होय.”

सामायिक करा
योहान 6 वाचा