या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला. आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते. फिलिप्पाने त्यास उत्तर दिले, “त्यांच्यातल्या प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी पुरणार नाहीत.” त्याच्या शिष्यांतला एकजण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यास म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी आणि दोन मासळ्या आहेत; परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले. येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.” मग जेवणार्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे.”
योहा. 6 वाचा
ऐका योहा. 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहा. 6:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ