योहान 12:1-19
योहान 12:1-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानीस आला. जो लाजर मेला होता व ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली; तेव्हा मार्था वाढत होती; आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणार्यांपैकी एक होता. तेव्हा मरीयेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यांतील एक जण यहूदा इस्कर्योत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, “हे सुगंधी तेल तीनशे रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही?” त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो तसे म्हणाला. ह्यावरून येशूने म्हटले, “हिच्या वाटेस जाऊ नका. माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही.” तो तेथे आहे असे यहूदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरता नाही तर ज्या लाजराला त्याने मेलेल्यांतून उठवले होते त्यालाही पाहण्याकरता ते आले. मुख्य याजकांनी लाजरालाही जिवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा’ इस्राएलाचा राजा ‘धन्यवादित असो!’ येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. “हे सीयोनेच्या कन्ये, भिऊ नकोस; पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो!” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या; परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यांतून उठवले, त्या वेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्याने त्याबद्दल साक्ष दिली. त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्याला भेटण्यास गेले. मग परूशी एकमेकांना म्हणाले, “तुमचे काही चालत नाही हे लक्षात आणा; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”
योहान 12:1-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू वल्हांडणाच्या सहा दिवस आधी बेथानीस आला आणि ज्या लाजराला येशूने मरण पावलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले आणि मार्था वाढीत होती. पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यात लाजर हा एक होता. तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले. तेव्हा, त्याच्या शिष्यांतला एक, त्यास धरून देणार होता तो यहूदा इस्कार्योत म्हणाला, “हे सुवासिक तेल तीनशे चांदीच्या नाण्यांस विकून ते गरीबास का दिले नाही?” त्यास गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला. यावरुन येशूने म्हटले, “तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही.” तो तेथे आहे असे यहूद्यातील पुष्कळ लोकांस कळले आणि केवळ येशूकरता नाही, तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले. पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला. कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेम शहरास येत आहे असे ऐकून, खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!” धन्यवादित असो. आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला. ‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर, त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते. त्याने लाजराला कबरेतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली. त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्यास भेटावयास गेले. मग परूशी एकमेकांस म्हणाले, “तुमचे काहीच चालत नाही, हे तुम्ही पाहता; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”
योहान 12:1-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवसापूर्वी, येशू जेथे लाजर, ज्याला येशूंनी मेलेल्यातून उठविले होते राहत होता त्या बेथानी गावी आले. तेथे त्यांनी येशूंच्या सन्मानार्थ संध्याकाळचे भोजन दिले. मार्था जेवण वाढत होती, त्यावेळी लाजर मेजाभोवती येशूंबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी एक होता. मरीयेने अर्धा लिटर, शुद्ध जटामांसीचे मौल्यवान सुगंधी तेल; येशूंच्या पायावर ओतले आणि आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. परंतु येशूंच्या शिष्यांपैकी एकजण, यहूदा इस्कर्योत जो येशूंचा विश्वासघात करणार होता, त्याने विरोध केला, “वास्तविक ते तेल विकून येणारे पैसे गोरगरिबांना सहज दान करता आले नसते का? त्या तेलाचे मोल एका वर्षाच्या मजुरीएवढे होते.” त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला नाही, तर तो चोर होता; व पैशाच्या पिशवीचा मालक असून, जे काही त्यात टाकले जाई त्यातून स्वतःसाठी काढून घेत असे. त्यावर येशू म्हणाले, “तिला असू दे, माझ्या उत्तरक्रियेसाठी सुगंधी तेल तिने बचत करून ठेवले होते. गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर राहतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.” तितक्यात येशू तेथे आले आहे हे समजून, यहूदी लोकांचा समुदाय तेथे आला, तेव्हा केवळ त्यानांच नव्हे तर लाजर ज्याला येशूंनी मरणातून उठविले त्यालाही पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली. हे पाहून मुख्य याजकांनी लाजराला देखील जिवे मारण्याची योजना केली. यासाठी की अनेक यहूदी लोक लाजरामुळे येशूंवर विश्वास ठेवू लागले होते. दुसर्या दिवशी येशू यरुशलेमला येत आहेत ही बातमी वल्हांडण सणासाठी आलेल्या मोठ्या समुदायाने ऐकली. त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना!” “प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो!” “इस्राएलचा राजा धन्यवादित असो!” येशूंना एक गाढवीचे शिंगरू सापडले व ते त्यावर बसले, शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “सीयोनकन्ये भिऊ नको; पाहा, तुझा राजा येत आहे गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.” हे प्रथम त्यांच्या शिष्यांना समजले नाही; परंतु येशूंचे गौरव झाल्यानंतर, त्यांना समजून आले की, ज्या गोष्टी येशूंबद्दल लिहिल्या गेल्या होत्या त्याच गोष्टी त्यांच्यासाठी करण्यात आल्या होत्या. येशूंनी लाजराला कबरेमधून बाहेर बोलावले व मरणातून उठविले, त्यावेळेस जो लोकसमुदाय तेथे होता त्यांनी वचनाचा प्रचार करणे सुरू ठेवले. ज्यांनी त्या चिन्हाबद्दल ऐकले होते, असे अनेक लोक येशूंना भेटण्यासाठी गेले. यास्तव परूशी एकमेकांना म्हणू लागले, “आपण काहीच साध्य केले नाही. पाहा, सारे जग कसे त्याच्यामागे जात आहे!”
योहान 12:1-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ओलांडण सणाच्या सहा दिवस आधी येशू बेथानीस आला. ज्या लाजरला येशूने मेलेल्यांतून उठवले होते, तो तेथे राहत होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी भोजन आयोजित केले. मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. मरियेने अर्धा लिटर शुद्ध जटामांसीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि स्वतःच्या केसांनी त्याचे चरण पुसले, तेव्हा त्या तेलाचा सुगंध घरभर दरवळला. मात्र जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो म्हणजे त्याच्या शिष्यांपैकी यहुदा इस्कर्योत म्हणाला, “हे सुगंधी तेल तीनशे चांदीच्या नाण्यांना विकून ती रक्कम गरिबांना का दिली नाही?” त्याला गरिबांविषयी कळवळा होता म्हणून तो हे म्हणाला असे नव्हे तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पैशाची थैली होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला. परंतु येशूने म्हटले, “तिच्याजवळ जे आहे, ते तिला माझ्या अंत्यसंस्काराच्या दिवसासाठी ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याबरोबर आहेत. परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असेन असे नाही.” तो तेथे आहे, असे पुष्कळ यहुदी लोकांना कळले आणि केवळ येशूकरता नव्हे, तर ज्या लाजरला त्याने मेलेल्यांतून उठवले होते, त्याला पाहण्याकरता लोक तेथे आले. म्हणून मुख्य याजकांनी लाजरलाही ठार मारण्याचा निश्चय केला; कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून गेले आणि येशूवर विश्वास ठेवू लागले. सणास आलेल्या पुष्कळ लोकांनी येशू यरुशलेममध्ये येत आहे, असे दुसऱ्या दिवशी ऐकले. ते खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! देवाचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलचा राजा धन्य असो!” येशूला शिंगरू मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला कारण धर्मशास्त्रलेख असा आहे: हे सीयोनकन्ये, भिऊ नकोस. पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नाहीत. परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवले की, हे त्याच्याविषयी लिहिले होते आणि त्याप्रमाणे लोकांनी त्याच्यासाठी हे केले. येशूने लाजरला कबरीतून बोलावून मेलेल्यांतून उठवले, त्या वेळी जे लोक त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याबद्दल साक्ष दिली होती. ह्यामुळेही लोक त्याला भेटायला गेले कारण त्याने हे चिन्ह केले होते, असे त्यांनी ऐकले. परुशी एकमेकांना म्हणाले, “आपले काही चालत नाही, हे लक्षात घ्या. पाहा, सगळे जग त्याच्यामागे चालले आहे.”