ओलांडण सणाच्या सहा दिवस आधी येशू बेथानीस आला. ज्या लाजरला येशूने मेलेल्यांतून उठवले होते, तो तेथे राहत होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी भोजन आयोजित केले. मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. मरियेने अर्धा लिटर शुद्ध जटामांसीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि स्वतःच्या केसांनी त्याचे चरण पुसले, तेव्हा त्या तेलाचा सुगंध घरभर दरवळला. मात्र जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो म्हणजे त्याच्या शिष्यांपैकी यहुदा इस्कर्योत म्हणाला, “हे सुगंधी तेल तीनशे चांदीच्या नाण्यांना विकून ती रक्कम गरिबांना का दिली नाही?” त्याला गरिबांविषयी कळवळा होता म्हणून तो हे म्हणाला असे नव्हे तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पैशाची थैली होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला. परंतु येशूने म्हटले, “तिच्याजवळ जे आहे, ते तिला माझ्या अंत्यसंस्काराच्या दिवसासाठी ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याबरोबर आहेत. परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असेन असे नाही.” तो तेथे आहे, असे पुष्कळ यहुदी लोकांना कळले आणि केवळ येशूकरता नव्हे, तर ज्या लाजरला त्याने मेलेल्यांतून उठवले होते, त्याला पाहण्याकरता लोक तेथे आले. म्हणून मुख्य याजकांनी लाजरलाही ठार मारण्याचा निश्चय केला; कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून गेले आणि येशूवर विश्वास ठेवू लागले. सणास आलेल्या पुष्कळ लोकांनी येशू यरुशलेममध्ये येत आहे, असे दुसऱ्या दिवशी ऐकले. ते खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! देवाचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलचा राजा धन्य असो!” येशूला शिंगरू मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला कारण धर्मशास्त्रलेख असा आहे: हे सीयोनकन्ये, भिऊ नकोस. पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नाहीत. परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवले की, हे त्याच्याविषयी लिहिले होते आणि त्याप्रमाणे लोकांनी त्याच्यासाठी हे केले. येशूने लाजरला कबरीतून बोलावून मेलेल्यांतून उठवले, त्या वेळी जे लोक त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याबद्दल साक्ष दिली होती. ह्यामुळेही लोक त्याला भेटायला गेले कारण त्याने हे चिन्ह केले होते, असे त्यांनी ऐकले. परुशी एकमेकांना म्हणाले, “आपले काही चालत नाही, हे लक्षात घ्या. पाहा, सगळे जग त्याच्यामागे चालले आहे.”
योहान 12 वाचा
ऐका योहान 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 12:1-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ