यिर्मया 31:23-34
यिर्मया 31:23-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो! यहूदा व त्यातील सर्व नगरे ह्यांतले लोक शेतकरी व मेंढरांचे कळप घेऊन फिरणारे असे तेथे एकत्र राहतील. कारण श्रांत जिवास मी तृप्त केले आहे, प्रत्येक म्लान हृदयास पुन्हा भरून काढले आहे.” ह्यानंतर मी जागा होऊन पाहतो तर ही माझी निद्रा मला गोड अशी भासली. परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी इस्राएलाच्या घराण्यात व यहूदाच्या घराण्यात मनुष्यबीज व पशुबीज पेरीन. आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावर नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो. ‘बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,’ असे त्या काळी लोक म्हणणार नाहीत. तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दांत आंबतील. परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”
यिर्मया 31:23-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी लोकांस परत त्यांच्या देशात आणीन, यहूदाच्या नगरांत व देशात राहणारे ते हे म्हणतील, ‘तुझी धार्मिकतेची जागा जेथे तो राहतो, तू पवित्र पर्वता, परमेश्वर तुझे कल्याण करो! कारण यहूदा आणि त्याची सर्व नगरे एकत्र राहतील. तेथे शेतकरी आणि मेंढपाळ त्याच्या कळपाबरोबर राहतील. कारण मी थकलेल्यांना पिण्यास पाणी देईन आणि तहानेने व्याकुळ झालेल्या प्रत्येक जीवास भरेन. यानंतर, मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की, माझी झोप ताजीतवानी करणारी होती. परमेश्वराचे म्हणणे असे आहे. “पाहा, असे दिवस येत आहेत की ज्यात मी यहूदाच्या व इस्राएलाच्या घराण्यांत मनुष्यबीज आणि पशुबीज पेरीन. मग असे होईल की, उपटायला व पाडायला, मोडायला व नाशाला, व पीडायला जशी मी त्यांच्यावर नजर ठेवत असे, तशी बांधायला व लावायला मी त्यांच्यावर नजर ठेवीत जाईन.” असे परमेश्वर म्हणतो. “त्या दिवसात कोणीही पुन्हा असे म्हणणार नाहीत की, वडिलाने आंबट द्राक्षे खाल्ली, पण मुलांचे दात आंबले आहेत. कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या अन्यायात मरेल. जो प्रत्येकजण आंबट द्राक्षे खाईल, त्याचेच दात आंबतील.” परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, “मी इस्राएलाच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन. मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो. “पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. नंतर परमेश्वरास ओळखा असे म्हणून पुढे प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याला किंवा प्रत्येक आपल्या भावाला शिकवणार नाही. कारण लहानापासून थोरापर्यंत मला ओळखतील.” असे परमेश्वर म्हणतो. “कारण मी त्यांच्या अन्यायांची त्यांना क्षमा करीन आणि मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”