यिर्मया 31
31
1परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व वंशांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”
2परमेश्वर म्हणतो, “तलवारीपासून निभाव-लेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला; ह्या इस्राएलास विश्रांती देण्यास मला जाणे आहे.
3परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.
4हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्यांनी भूषित होशील व उत्सव करणार्यांबरोबर नृत्य करशील.
5शोमरोनाच्या डोंगरावर तू पुन्हा द्राक्षमळे लावशील; लावणारे लावतील व त्यांची फळे त्यांना लाभतील.
6कारण असा दिवस येत आहे की त्यात एफ्राईम डोंगरावर जागल्ये ओरडून सांगतील, ‘अहो उठा, आपण सीयोनेस आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे जाऊ.”’
7कारण परमेश्वर म्हणतो, “याकोबासाठी आनंदाचा गजर करा; राष्ट्रांच्या अग्रेसराचा जयजयकार करा; घोषणा करा, स्तवन करा व म्हणा, ‘हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचा, इस्राएलाच्या अवशेषाचा उद्धार कर.’
8पाहा, मी त्यांना उत्तरेच्या देशांतून आणीन, त्यांना पृथ्वीच्या दिगंताहून जमा करीन; त्यांच्यामध्ये आंधळे व पांगळे, गर्भवती व प्रसूतिवेदना लागलेल्या असतील; मोठ्या समुदायाने ते इकडे परत येतील.
9ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे.
10अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका; दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा व म्हणा, ‘ज्याने इस्राएलास विखरले तो त्यांना जमा करील;’ मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करतो तशी तो त्यांची निगा करील.
11कारण परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून मुक्त केले आहे.
12ते येऊन सीयोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षारस, ताजे तेल व गुरामेंढरांचे वत्स ह्यांकडे लोटतील; त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल; ह्यापुढे ते म्लान होणार नाहीत.
13त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील; वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील; मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन, मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन.
14आणि मी त्यांच्या याजकांचा जीव मिष्टान्नांनी तृप्त करीन; माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील, असे परमेश्वर म्हणतो.”
15परमेश्वर असे म्हणतो, “रामात शोक व आकांत ह्यांचा शब्द ऐकू येत आहे; राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे; आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत.”
16परमेश्वर असे म्हणतो, “तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर; कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल; ते शत्रूंच्या देशांतून परत येतील, असे परमेश्वर म्हणतो.
17परमेश्वर म्हणतो, तुला भावी सुस्थितीची आशा आहे; तुझी मुले आपल्या सीमेच्या आत परत येतील.
18मी एफ्राइमास खरोखर असा विलाप करताना ऐकले आहे की, ‘बेबंद वासरासारखा जो मी, त्या मला तू शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली; तू मला वळव म्हणजे मी वळेन; कारण हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
19मी वळल्यावर पश्चात्ताप केला; मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर1 बडवू लागलो; माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजीत झालो आहे.’
20एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना? तो माझा लाडका मुलगा आहे ना? मी वारंवार त्याच्याविरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करीतच असतो; म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात; मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो.
21वाटेवर आपल्यासाठी खुणा कर; खुणेचे खांब उभे कर; ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव; हे इस्राएलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या ह्या नगरास परत ये.
22हे मला सोडून जाणार्या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.”
23सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो!
24यहूदा व त्यातील सर्व नगरे ह्यांतले लोक शेतकरी व मेंढरांचे कळप घेऊन फिरणारे असे तेथे एकत्र राहतील.
25कारण श्रांत जिवास मी तृप्त केले आहे, प्रत्येक म्लान हृदयास पुन्हा भरून काढले आहे.”
26ह्यानंतर मी जागा होऊन पाहतो तर ही माझी निद्रा मला गोड अशी भासली.
नवा करार
27परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी इस्राएलाच्या घराण्यात व यहूदाच्या घराण्यात मनुष्यबीज व पशुबीज पेरीन.
28आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावर नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो.
29‘बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,’ असे त्या काळी लोक म्हणणार नाहीत.
30तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दांत आंबतील.
31परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;
32परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला.
33तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
34परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”
35जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की,
36“यदाकदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र ह्या पदापासून अक्षय ढळेल.”
37परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वांमुळे मी त्या सगळ्या वंशांचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो.
38“परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत परमेश्वरासाठी हानानेलाच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत नगर बांधून काढतील;
39आणि मापनसूत्र पुन्हा एकदा थेट गारेबाच्या टेकडीवर लागेल व तेथून गवाथाकडे वळसा घेईल.
40प्रेतांचे व राखेचे सर्व खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपर्यापर्यंत सर्व शेते परमेश्वराला पवित्र होतील; पुन्हा कधीही ती उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”
सध्या निवडलेले:
यिर्मया 31: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.