यिर्मया 3:6-8
यिर्मया 3:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला. मी म्हणालो, “ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.” पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहीण, यहूदाने पाहिले. धर्मत्यागी इस्राएल! या सर्व कारणांमुळे तीने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे. तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहूदा भयभीत झाली नाही आणि तिनेसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला.
यिर्मया 3:6-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योशीयाह राजाच्या शासनकाळात, याहवेहने मला म्हटले, “तुम्ही पहिले का अविश्वासू इस्राएलने काय केले आहे? एखाद्या दुराचारी स्त्रीप्रमाणे प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली व्यभिचार करते. मला वाटले हे सर्वकाही झाल्यानंतर ती माझ्याकडे परत येईल, परंतु ती माझ्याकडे परत आलीच नाही आणि हा बंडखोरपणा तिच्या विश्वासघातकी बहिणीने, यहूदीया हिने पाहिला. मी अविश्वासू इस्राएलला तिच्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले आणि तिच्या सर्व व्यभिचारामुळे तिला पाठवले. तरीही मी पाहिले की तिची अविश्वासू बहीण यहूदाहला मुळीच भय वाटले नाही. तीही बाहेर गेली व तिने व्यभिचार केला.
यिर्मया 3:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याशिवाय योशीया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, “मला सोडून जाणारी इस्राएल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला. मी म्हणालो, ‘हे सर्व केल्यावर तरी तिने माझ्याकडे परत यावे ना?’ पण ती आली नाही; तिची बेइमान बहीण यहूदा हिने हे पाहिले; आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.