YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 3:1-18

यिर्मया 3:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे. तू वेश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे? असे परमेश्वर म्हणतो. डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस. म्हणून वसंत ऋतूतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही. पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा. तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस. माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय. “तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?” पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.” नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला. मी म्हणालो, “ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.” पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहीण, यहूदाने पाहिले. धर्मत्यागी इस्राएल! या सर्व कारणांमुळे तीने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे. तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहूदा भयभीत झाली नाही आणि तिनेसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला. तिने तिचा राष्ट्र “भ्रष्ट” केला ह्याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यांपासून त्यांनी मूर्ती तयार केल्या. इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले. असे परमेश्वर म्हणतो तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “विश्वासहीन इस्राएल अविश्वासू यहूदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे! तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषीत कर. परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहीन इस्राएला, परत ये! परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्यावर नेहमीच संतापणार नाही, कारण मी विश्वासू आहे, मी सर्वकाळ क्रोध धरणार नाही. तुम्ही पाप केले आहे, तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरूद्ध गेलात. प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू अन्य दैवतांसोबत आपले मार्ग वाटून घेतले, आणि माझा शब्द ऐकला नाही, असे परमेश्वर म्हणतो. अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे. मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन. माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील. आणि त्या दिवसात असे होईल की, तुम्ही देशात बहूतपट असे व्हाल आणि फळ द्याल. परमेश्वर असे म्हणतो, त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, परमेश्वराच्या कराराचा कोश, असे ते आणखी म्हणणार नाही. येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. ते कोणी बनवणार पण नाही. त्या वेळेला यरूशलेम बद्दल अशी घोषणा करतील, हे परमेश्वराचे सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरूशलेममध्ये एकत्र येतील. या पुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत. त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.

सामायिक करा
यिर्मया 3 वाचा

यिर्मया 3:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात. “उजाड टेकडीकडे आपली दृष्टी कर व पाहा. असे कोणते स्थान आहे जिथे तुझ्यासह कुकर्म केले गेले नाही? रस्त्याच्या कडेला तू आपल्या प्रियकरांची वाट बघतेस, एखाद्या अरबीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीसारखी बसून राहतेस. आपल्या कुकर्माने व जारकर्माने तू सर्व भूमी दूषित केली आहेस. यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे. वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही, तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस, पण तू शरमिंदी होण्यास नकार देते. तू मला आताच म्हणालीस ना, ‘माझ्या पित्या, माझ्या तारुण्यातील मित्रा, तू नेहमीसाठी रागावला आहेस का? हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ याप्रकारे तू बोलतेस, परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.” योशीयाह राजाच्या शासनकाळात, याहवेहने मला म्हटले, “तुम्ही पहिले का अविश्वासू इस्राएलने काय केले आहे? एखाद्या दुराचारी स्त्रीप्रमाणे प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली व्यभिचार करते. मला वाटले हे सर्वकाही झाल्यानंतर ती माझ्याकडे परत येईल, परंतु ती माझ्याकडे परत आलीच नाही आणि हा बंडखोरपणा तिच्या विश्वासघातकी बहिणीने, यहूदीया हिने पाहिला. मी अविश्वासू इस्राएलला तिच्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले आणि तिच्या सर्व व्यभिचारामुळे तिला पाठवले. तरीही मी पाहिले की तिची अविश्वासू बहीण यहूदाहला मुळीच भय वाटले नाही. तीही बाहेर गेली व तिने व्यभिचार केला. कारण इस्राएलच्या दृष्टीत हा व्यभिचार अल्पमात्र होता, तिने सर्व भूमीला भ्रष्ट केले आहे आणि लाकडांच्या व दगडांच्या मूर्तींशी व्यभिचार केला आहे. हे सगळे घडून सुद्धा तिची अविश्वासू बहीण, यहूदीया, तिच्या संपूर्ण हृदयाने माझ्याकडे परतली नाही, परंतु तिच्यात खोटेपणाच दिसला,” असे याहवेह म्हणतात. याहवेहने मला म्हटले, “विश्वासघातकी यहूदीयापेक्षा विश्वासहीन इस्राएल अधिक नीतिमान आहे. उत्तर दिशाकडे जाऊन, संदेशाची घोषणा करा: “ ‘हे अविश्वासू इस्राएल परत ये, मी तुझ्यावर कायमचाच राग धरणार नाही, कारण मी विश्वासू आहे,’ याहवेह म्हणतात ‘मी नेहमीच क्रोध करणार नाही, केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा— तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे, इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली, माझे आज्ञापालन केले नाही,’ ” असे याहवेह म्हणतात. “विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन. नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल. हे त्या दिवसामध्ये होईल, जेव्हा तुम्ही देशात बहुगुणित व्हाल,” याहवेह अशी घोषणा करतात, “तेव्हा लोक असे म्हणणार नाहीत, ‘याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या मनात येणार नाही.’ ते कधीही त्यांच्या लक्षात येणार नाही, त्यांना आठवणसुद्धा राहणार नाही; ते त्याच्याविषयी पुन्हा विचार करणार नाहीत, दुसरा कोश पुन्हा निर्माण होणार नाही. त्यावेळी ते यरुशलेमला याहवेहचे सिंहासन असे म्हणतील, आणि याहवेहच्या नावाला आदर देण्यासाठी सर्व राष्ट्रे तिथे तिच्याकडे येतील. ते त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाने चालणार नाहीत. त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील.

सामायिक करा
यिर्मया 3 वाचा

यिर्मया 3:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर म्हणतो, कोणी आपली बायको टाकली व ती त्याच्यापासून निघून जाऊन दुसर्‍याची झाली तर तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल काय? अशाने देश भ्रष्ट होणार नाही काय? तू तर अनेक जारांशी व्यभिचार केला तरी तू माझ्याकडे पुन्हा फिरू पाहतेस काय? असे परमेश्वर म्हणतो. डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या शिंदळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहेस. ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही. ‘माझ्या बापा, माझ्या तारुण्यातील मार्गदर्शक तूच आहेस’, असे तू आतापासून मला म्हणणार नाहीस काय? ‘तो नेहमी मनात अढी धरील काय? तो सर्वकाळ ती ठेवील काय?’ पाहा, तू असे बोलतेस खरी, तरी कुकर्मे करतेस व आपलाच क्रम चालवतेस.” ह्याशिवाय योशीया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, “मला सोडून जाणारी इस्राएल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला. मी म्हणालो, ‘हे सर्व केल्यावर तरी तिने माझ्याकडे परत यावे ना?’ पण ती आली नाही; तिची बेइमान बहीण यहूदा हिने हे पाहिले; आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली. तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला; तिने काष्ठपाषाणांशी व्यभिचार केला. इतके असूनही तिची बेइमान बहीण यहूदा मनापासून माझ्याकडे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो.” परमेश्वर मला म्हणाला, “बेइमान यहूदापेक्षा मला सोडून जाणारी इस्राएल कमी दोषी आहे. जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाहीस, हा आपला दोष मात्र पदरी घे, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा; कारण मी लग्नाचा नवरा आहे; मी तुम्हांला ह्या शहरातून एक, त्या कुळांतून दोघे, असे घेऊन सीयोनेस आणीन. मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हांला ज्ञान व अक्कल ह्यांनी तृप्त करतील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल त्या काळी ‘परमेश्वराच्या कराराचा कोश’ असे ते ह्यापुढे म्हणणार नाहीत, तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यांना तो आठवणारही नाही, ते त्याची खंत करणार नाहीत, आणि तो पुन्हा बनवणार नाहीत. त्या काळी यरुशलेमेस परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील. कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमेत आहे; ह्यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत. त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्याबरोबर चालेल, ते उत्तरेकडील देशातून निघून एकत्र होतील व तुमच्या पूर्वजांना मी वतन करून दिलेल्या देशात येतील.

सामायिक करा
यिर्मया 3 वाचा