YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 1:1-10

यिर्मया 1:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने: म्हणजे यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षात परमेश्वराचे वचन यीर्मयाकडे आले. तसेच यहूदाचा राजा योशीया ह्याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या दिवसात, आणि यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पाचव्या महिन्यात, जेव्हा यरूशलेमधील लोकांस पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले. परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले, “मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे, आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे.” मी म्हणालो, “अहा! परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे.” पण परमेश्वर मला म्हणाला, “मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे, आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील. त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.” मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत. खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी, आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी, आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”

सामायिक करा
यिर्मया 1 वाचा

यिर्मया 1:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील याजकांपैकी हिल्कियाहचा पुत्र यिर्मयाहचे वचन. यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले, आणि यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम, याच्या राजवटीपासून आणि यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याच्या राजवटीच्या अकराव्या वर्षाच्या पाचवा महिना संपला, जेव्हा यरुशलेममधील लोक बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा. याहवेहचे वचन मला मिळाले ते असे, “मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो, तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे; आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.” मी म्हटले, “अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे.” परंतु याहवेह मला म्हणाले, “ ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल. त्यांना भिऊ नकोस, मी तुला संकटातून सोडविण्यासाठी तुझ्यासह आहे,” याहवेह असे जाहीर करीत आहेत. तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे. पाहा, आज मी तुझी काही राष्ट्रे आणि राज्ये उपटून टाकण्यासाठी, काहींचा नाश करण्यासाठी, तर काहींची स्थापना, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांच्यावर तुझी नेमणूक करीत आहे.”

सामायिक करा
यिर्मया 1 वाचा

यिर्मया 1:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने : यहूदाचा राजा आमोनपुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले. तसेच यहूदाचा राजा योशीयापुत्र यहोयाकीम ह्याच्या काळापासून यहूदाचा राजा योशीयापुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे पाचव्या महिन्यात यरुशलेमकरांना बंदिवान करून नेले तेथवर ते वचन आले. परमेश्वराचे वचन मला आले ते असे : “मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.” तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत; पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”

सामायिक करा
यिर्मया 1 वाचा