YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 1

1
यिर्मयाला पाचारण व त्याचे कार्य
1बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने :
2यहूदाचा राजा आमोनपुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले.
3तसेच यहूदाचा राजा योशीयापुत्र यहोयाकीम ह्याच्या काळापासून यहूदाचा राजा योशीयापुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे पाचव्या महिन्यात यरुशलेमकरांना बंदिवान करून नेले तेथवर ते वचन आले.
4परमेश्वराचे वचन मला आले ते असे :
5“मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”
6तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.”
7मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल.
8त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
9तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत;
10पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”
11मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “यिर्मया तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या1 झाडाची डाहळी दिसते.”
12परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.”
13परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, “तुला काय दिसते? मी म्हणालो, “एक उकळती कढई दिसते; तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”
14तेव्हा परमेश्वर म्हणाला, “देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल.
15कारण पाहा, मी उत्तरेकडल्या राष्ट्रांतील सर्व जाती बोलावत आहे, असे परमेश्वर म्हणतो; ते येऊन यरुशलेमेच्या वेशींपुढे, तिच्या सभोवार असलेल्या सर्व तटांपुढे व यहूदाच्या सर्व नगरांपुढे आपापली सिंहासने स्थापतील.
16त्यांनी मला सोडले आहे, अन्य देवांपुढे धूप जाळला आहे व आपल्या हातच्या कृतींची पूजा केली आहे; त्यांच्या ह्या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यांना शिक्षा फर्मावीन.
17तू तर आपली कंबर कस; ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग; त्यांना घाबरू नकोस; घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरवीन.
18पाहा, आज ह्या सगळ्या देशांविरुद्ध, यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक ह्यांच्याविरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो.
19ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”

सध्या निवडलेले:

यिर्मया 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन