शास्ते 7:1-21
शास्ते 7:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे जे सर्व लोक ह्यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी लोकांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत; अशाप्रकारे इस्राएल मजविरूद्ध अशी बढाई मारून म्हणतील की, आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो. तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, ‘जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे,’ त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे.” तेव्हा लोकांतून बावीस हजार लोक माघारी गेले आणि दहा हजार राहिले. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; तू त्यांना खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, त्याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, त्याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.” मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्यास तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्यास एकीकडे ठेव.” तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले, ते पुरुष मोजले, ते तीनशे होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले. नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जे तीनशे पुरुष पाणी चाटून प्याले त्यांच्याकडून मी तुम्हाला सोडवीन, आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; यास्तव बाकीच्या सर्व लोकांस आपल्या ठिकाणी जाऊ दे.” तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्नसामग्री व त्यांची रणशिंगे घेतली, आणि त्याने इस्राएलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठवली; केवळ ती तीनशे माणसे ठेवली. तेव्हा मिद्यान्यांचा तळ त्यांच्या खाली खिंडीत होता. आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्यास सांगितले, “तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे. आणि जर तुला खाली जायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा यालाबरोबर घेऊन खाली तळाजवळ जा. आणि ते जे बोलतील, ते तू ऐक; म्हणजे तुझे हात बळकट होतील आणि तू उतरून तळावर जाशील. तेव्हा तळात जे हत्यारबंद होते,” त्यांच्या काठापर्यंत तो आपला सेवक पुरा याला घेऊन खाली गेला. तेव्हा मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणांप्रमाणे असंख्य होते. मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, “पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटून भुई सपाट झाला.” तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, “इस्राएली मनुष्य योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तलवार! तिच्याशिवाय हे दुसरे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.” तेव्हा असे झाले की गिदोनाने ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली; मग तो इस्राएली तळावर माघारी येऊन बोलला, “तुम्ही उठा, कारण की परमेश्वराने मिद्यानी तळ तुमच्या हाती दिला आहे.” तेव्हा त्याने त्या तीनशे मनुष्यांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यांमध्ये दिवे दिले होते. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही माझ्याकडे पाहा आणि मी करतो तसे करा; आता पाहा, मी छावणीच्या काठी जातो, जसे मी करतो तसे तुम्ही करा. म्हणजे जेव्हा मी कर्णा वाजवीन, तेव्हा, मी आणि माझ्याबरोबर असणारे सर्व संपूर्ण छावणीच्या चहुकडे कर्णे वाजवीत म्हणा, परमेश्वरासाठी व गिदोनासाठी.” तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातली मडकी फोडली. असे त्या तिन्ही टोळ्यांनी कर्णे वाजवले, आणि मडकी फोडली; “मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायचे कर्णे आपल्या उजव्या हाती धरले, आणि परमेश्वराची तलवार व गिदोनाची तलवार, अशी गर्जना केली.” तेव्हा ते छावणीच्या चोहोकडून आपापल्या ठिकाणी उभे राहिले; आणि छावणीतल्या सर्व मिद्यानी लोकांनी पलायन केले. ते मोठ्याने आरोळी मारीत दूर पळाले.
शास्ते 7:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक ह्यांनी पहाटेस उठून एन-हरोद1 येथे तळ दिला; त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोर्यात मिद्यानाची छावणी होती. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत; इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्यांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्राएल मारील. म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की, ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरट असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे.” तेव्हा त्यांच्यातून बावीस हजार लोक परत गेले आणि दहा हजार राहिले. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्याबरोबर जावे तर त्याने तुझ्याबरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्याबरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये.” त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ; तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ.” जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते तीनशे भरले; बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्याले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “चाटून पाणी पिणार्या ह्या तीनशे लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे.” मग त्या लोकांनी अन्नसामग्री व लोकांकडली रणशिंगे हाती घेतली; त्याने बाकीच्या सर्व इस्राएल लोकांना आपापल्या डेर्यांकडे पाठवून दिले, पण त्या तीनशे लोकांना मात्र ठेवून घेतले. मिद्यानाची छावणी खाली खोर्यात होती. त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, “ऊठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे. तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा. आणि ते काय बोलत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करायला हिंमत येईल.” मग तो आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीच्या सीमेवर एका टोकाला हत्यारबंद संत्री होते त्यांच्याजवळ गेला. त्या खोर्यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्रकिनार्यावरील वाळूप्रमाणे अगणित होते. गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता; तो म्हणाला, “ऐक, मी स्वप्नात पाहिले की, सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली. तिने डेर्याला असा धक्का दिला की तो पडला; तो उलटून पडला व भुईसपाट झाला.” त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “योवाशाचा मुलगा गिदोन ह्या इस्राएली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे; त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे.” ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकून गिदोनाने दंडवत घातले; मग तो इस्राएलाच्या छावणीत परत येऊन म्हणाला, “ऊठा, कारण परमेश्वराने मिद्यानाचे सैन्य तुमच्या हाती दिले आहे.” त्याने त्या तीनशे लोकांच्या तीन तुकड्या केल्या; त्या सर्वांच्या हातांत त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले; त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या. तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडे पाहा, आणि मी करतो तसे करा; छावणीच्या सीमेवरील टोकावर मी पोहचलो म्हणजे मी करीन तसे करा. मी व माझ्याबरोबरचे सर्व जण रणशिंगे फुंकू तेव्हा तुम्हीही छावणीच्या सभोवती रणशिंगे फुंका आणि म्हणा, ‘परमेश्वराचा जय, गिदोनाचा जय!”’ रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला तेव्हा गिदोन आपल्या शंभर पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला; मग त्यांनी रणशिंगे फुंकून आपल्या हातांतील घडे फोडून टाकले. तेव्हा त्या तिन्ही तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हातात दिवट्या आणि उजव्या हातात फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तलवार, गिदोनाची तलवार असा घोष केला. तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली; तिने ओरडत ओरडत पळ काढला.