याकोब 3:5-12
याकोब 3:5-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत. पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे. आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो. एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत. झर्याच्या एकाच मुखातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे देईल काय? किंवा द्राक्षवेल अंजीरे देईल काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
याकोब 3:5-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचप्रमाणे, जीभ ही शरीराचा लहान अवयव आहे, परंतु ती मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. विचार करा, मोठ्या जंगलाला पेटविण्यासाठी आगीची एक लहान ठिणगी पुरेशी आहे. जीभ सुद्धा आग आहे, आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये ती दुष्टतेचे जग आहे. ती संपूर्ण शरीराला भ्रष्ट करते, एखाद्याच्या जीवनाला आग लावते आणि स्वतः नरकाच्या अग्निने पेटलेली आहे. सर्वप्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारा प्राणी आणि समुद्रातील प्राणी वश झाले आहेत आणि त्यांना मनुष्यप्राण्याने वश केले आहे. परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे. या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो. याप्रकारे स्तुती आणि शाप एकाच मुखातून निघतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे असू नये. एकाच झर्यातून दोन्ही प्रकारचे ताजे पाणी आणि खारट पाणी वाहू शकते काय? माझ्या बंधुंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे, आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही.
याकोब 3:5-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते! जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होत आहे, आणि झाला आहे; परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. झर्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसेच खार्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
याकोब 3:5-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जिभेचे तसेच आहे:जीभ लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते! जीभ ही आग आहे. ती अनीतीचे घर आहे, आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती आपल्या सृष्टिचक्राला नरकाग्नीने पेटवते. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या सर्वांना मनुष्य वश करू शकतो व शकला आहे परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, ती दुष्ट व अनावर असून प्राणघातक विषाने भरलेली आहे. आपल्या प्रभूची व पित्याची स्तुती करण्यासाठी आपण ती वापरतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना शाप देण्याकरिताही तिचा उपयोग करतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत! झऱ्याच्या एकाच उगमातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला ऑलिव्ह फळे किंवा द्राक्षवेलीला अंजीर येऊ शकत नाहीत; तसेच खाऱ्या पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी निघणे शक्य नाही.