याकोब 2:1-12
याकोब 2:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला, तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.” तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही? पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही? आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना? खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात. पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता. कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो. कारण ज्याने म्हणले की, “व्यभिचार करू नको,” त्यानेच म्हणले की, “खून करू नको” आता, तू जर व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केला आहेस तर तू नियमशास्त्र उल्लंघणारा झालास. तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा.
याकोब 2:1-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय बंधू आणि भगिनींनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण पक्षपात करू नये. एखादा माणूस तुमच्या सभांमध्ये सोन्याची अंगठी घातलेला आणि उंची कपडे परिधान केलेला आला, व एक गरीब मनुष्य जुने आणि मळीन कपडे पांघरलेला आला. तर तुम्ही ज्याने उंची कपडे परिधान केले आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देता आणि म्हणता, “ही जागा तुमच्यासाठी चांगली आहे,” परंतु त्या गरीब माणसाला म्हणता, “तेथे उभा राहा” किंवा “माझ्या पायाजवळ जमिनीवर बैस,” तुम्ही आपसात भेदभाव केला की नाही आणि दुष्ट विचारांने न्याय करणारे झाले की नाही? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ऐका, परमेश्वराने जगाच्या दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासामध्ये धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना वचनानुसार राज्याचे वारस होण्यास निवडले नाही का? परंतु तुम्ही गरिबांचा अपमान केला आहे. धनवान लोकच तुमचे शोषण करतात की नाही? तेच लोक तुम्हाला न्यायालयात खेचतात की नाही? ज्या उत्कृष्ट नावावरून तुमची ओळख होते, त्या नावाची निंदा करणारे तेच नाहीत का? “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,” हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता. पण तुम्ही पक्षपात करता, तर पाप करता आणि नियम मोडणारे म्हणून नियमानुसार दोषी ठरता. जो कोणी सर्व नियम पाळतो, परंतु एका बाबीविषयी अडखळतो तो सर्व नियम मोडणार्या एवढाच दोषी आहे. ज्याने म्हटले की, “तू व्यभिचार करू नको,” तोच हे सुद्धा म्हणतो, “तू खून करू नको.” जर तू व्यभिचार करीत नाही परंतु खून करतो, तर तू नियम मोडणारा होतो. स्वतंत्रता देणार्या नियमाद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणून बोला व कृती करा
याकोब 2:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला; आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा;” आणि दरिद्र्याला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस;” तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही? पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही? जे उत्तम नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही? तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करता; आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. कारण “व्यभिचार करू नकोस” असे ज्याने सांगितले, त्यानेच, “खून करू नकोस,” हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उल्लंघणारा झाला आहेस. स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा.
याकोब 2:1-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही केवळ बाह्य रूप पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घालून व भपकेबाज कपडे परिधान करून एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि अस्वच्छ कपडे घातलेला एक गरीब माणूस आला असता तुम्ही भपकेबाज कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा” आणि गरिबाला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पायांशी बस.” तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही? माझ्या प्रिय बंधूनो, ऐका, ऐहिक दृष्टीने जे गरीब आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले, त्याचे वारस होण्यासाठी त्याने निवडले आहे की नाही? पण तुम्ही गरिबांचा अपमान करता. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही? जे चांगले नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही? म्हणून ‘तू जशी स्वत:वर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर’, हा धर्मशास्त्रातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत असाल तर ते बरे करता. परंतु जर तुम्ही बाह्यरूप पाहून वागत असाल तर पाप करता आणि उ्रंघन करणारे म्हणून नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. जो कोणी एका नियमाविषयी चुकतो तो संपूर्ण नियमशास्त्राविषयी दोषी होतो; कारण ‘व्यभिचार करू नको’ असे ज्याने सांगितले त्यानेच, ‘खून करू नको’, हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उ्रंघणारा झाला आहेस. स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा