याकोब 1:19-22
याकोब 1:19-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
याकोब 1:19-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या संतापाने परमेश्वर ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते साध्य होत नाही. यास्तव, सर्व अनैतिक घाण व दुष्टतेचा त्याग करा व जे वचन तुम्हामध्ये पेरलेले आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करा, ते वचन तुम्हाला तारावयास समर्थ आहे. वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा.
याकोब 1:19-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा; कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवांचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
याकोब 1:19-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझ्या प्रिय बंधूंनो, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास मंद व रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्व निर्माण होत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे तुमच्या अंतःकरणात असलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.