YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 1:1-27

याकोब 1:1-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार. माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते. आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे. म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो. पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे. अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल. कारण तो द्विमनाचा असून तो सर्व मार्गात अस्थिर असतो. दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा. आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल. जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल. कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही. तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो. मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला. माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने पालन करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल. जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे. अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.

सामायिक करा
याकोब 1 वाचा

याकोब 1:1-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून, राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना, शुभेच्छा. माझ्या बंधुंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षेंना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो. धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात. परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्‍याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्‍या समुद्राच्या लाटेसारखा आहे. अशा व्यक्तीने आपल्याला प्रभुपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये. असा मनुष्य दुहेरी मनाचा असून ज्या सर्वगोष्टी तो करतो त्यात अस्थिर असतो. गरीब परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा. परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील. कारण सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल. जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, जो जीवनी मुकुट प्रभुने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल. मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही; परंतु प्रत्येक मनुष्य त्याच्या स्वतःच्या दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो. मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली, म्हणजे पाप मरणास जन्म देते. म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो फसू नका. प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचा पिता जो छायेसारखा बदलत नाही त्याच्यापासून येते. त्याने आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्याने जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या संतापाने परमेश्वर ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते साध्य होत नाही. यास्तव, सर्व अनैतिक घाण व दुष्टता यांचा त्याग करा, व जे वचन तुम्हामध्ये पेरलेले आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करा, ते वचन तुम्हाला तारावयास समर्थ आहे. वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा. कारण जो कोणी वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले मुख पाहणार्‍यासारखा आहे. तो स्वतःकडे पाहिल्यावर निघून जातो आणि आपण कसे दिसत होतो हे ताबडतोब विसरतो. परंतु जो कोणी स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमांकडे लक्ष देतो आणि त्यामध्ये स्थिर राहतो, तो ऐकून विसरणारा न होता त्याप्रमाणे कृती करणारा होतो आणि तो जे काही करतो त्या गोष्टीत त्याला आशीर्वाद मिळतो. जे स्वतःला भक्त समजतात परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवीत नाहीत, ते स्वतःलाच फसवतात व त्यांची भक्ती व्यर्थ आहे. परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.

सामायिक करा
याकोब 1 वाचा

याकोब 1:1-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो; पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वार्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा, आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा; कारण तो ‘गवताच्या फुलासारखा’ नाहीसा होईल. सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने ‘गवत कोमेजवले, मग त्याचे फूल गळाले,’ आणि त्याच्या रूपाची शोभा गेली; ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल. जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही; तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्‍व झाल्यावर मरणास उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका; प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा; कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवांचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणार्‍या माणसासारखा आहे; तो स्वत:ला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.

सामायिक करा
याकोब 1 वाचा

याकोब 1:1-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा. माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना; कारण तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो. धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न पडता तुम्ही प्रगल्भ व पूर्ण व्हावे. परंतु जर तुमच्यापैकी कोणी सुज्ञतेत उणा असेल, तर त्याने ती देवाजवळ मागावी म्हणजे ती त्याला मिळेल कारण तो सर्वांना आनंदाने व उदारपणाने देतो. मात्र मागणाऱ्याने काही शंका न धरता विश्वासाने मागावे कारण शंका धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंचबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विधा मनःस्थितीचा असून आपल्या सर्व मार्गांत चंचल असतो. आपणाला प्रभूकडून काही मिळेल, असे त्याने समजू नये. प्रभूने आपल्याला उच्च स्थितीपर्यंत वर उचलले म्हणून दीन स्थितीतील बंधूने आनंद मानावा आणि प्रभूने आपल्याला दीन अवस्थेकडे आणले ह्याचा आनंद धनवानाने मानावा कारण धनवान गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य प्रखर तेजाने उगवला व त्याने गवत कोमेजविले, मग त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगात मस्त असताना कोमेजून जाईल. जो माणूस कसोटीत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, कसोटीस उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता, ‘देवाने मला मोहात पाडले’, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाइटाचा मोह पडत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. परंतु प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप पूर्ण वाढल्यावर मरणास उपजविते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. दानशूरपणाची प्रत्येक चांगली कृती व प्रत्येक पूर्ण दान वरून मिळते. ते ज्योतिर्मंडळाचा निर्माता, जो बदलत नाही किंवा बदलल्यामुळे छाया निर्माण करीत नाही, त्याच्याकडून मिळते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणू काही प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला. माझ्या प्रिय बंधूंनो, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास मंद व रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्व निर्माण होत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे तुमच्या अंतःकरणात असलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात स्वतःलापाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला आरशात पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो, हे लगेच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करून त्यांचे पालन करण्यात टिकून राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात देवाचा आशीर्वाद मिळतो. आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत कैवार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे, हे आहे.

सामायिक करा
याकोब 1 वाचा

याकोब 1:1-27

याकोब 1:1-27 MARVBSIयाकोब 1:1-27 MARVBSIयाकोब 1:1-27 MARVBSIयाकोब 1:1-27 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा