YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 8:1-15

यशया 8:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर-शालाल-हाश-बज असे लिही.” माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन. मी एका संदेष्ट्रीकडे गेलो. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला मग परमेश्वर मला म्हणाला, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव. कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.” परमेश्वर माझ्याशी पुन्हा बोलला, “हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात, आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात. म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील. तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील. आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल. हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.” अहो लोकांनो युध्द करा, पण तुमचा चुराडा होईल. दूरच्या सर्व देशांनो ऐका; युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुराडा होईल; स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुराडा होईल. योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही, कारण देव आम्हाबरोबर आहे. परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरुन असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको, तो म्हणाला, “हे लोक कोणत्याही गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका, ते ज्याला भितात त्यास तुम्ही भिऊ नका आणि घाबरु नका. सेनाधीश परमेश्वर, त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा आणि तोच एक असा पवित्र आहे, की तुम्हास त्याचा धाक वाटावा. तो एक पवित्रस्थान होईल; परंतु इस्राएलाच्या दोन्ही घराण्याला तो ठेच लागणारा धोंडा व अडखण्याचा खडक आणि यरूशलेमेतील रहिवाश्यास पाश व सापळा असा होईल. पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.”

सामायिक करा
यशया 8 वाचा

यशया 8:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह मला म्हणाले, “एक मोठी चर्मपत्राची पाटी घे आणि त्याच्यावर एका साध्या लेखणीने लिही: महेर-शालाल-हश-बाज.” म्हणून मी उरीयाह याजकाला आणि यबेरेक्याहचा पुत्र जखर्‍याहला माझ्यासाठी विश्वसनीय साक्षीदार म्हणून बोलाविले. तेव्हा मी माझी पत्नी, जी संदेष्टी आहे, तिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि ती गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. आणि याहवेह मला म्हणाले, “त्याचे नाव महेर-शालाल-हश-बाज असे ठेव. कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.” याहवेह पुन्हा माझ्याबरोबर असे बोलले: “कारण या लोकांनी हळूवारपणे वाहणारे शिलोहचे पाणी नाकारले आहे आणि रसीन आणि रमाल्याहच्या पुत्राबद्दल आनंद व्यक्त केला आहे. म्हणून प्रभू आता त्यांच्यावर फरात नदीचे महाप्रलय आणणार आहे— अश्शूरचा राजा त्याच्या सर्व वैभवात हे आणणार आहे. ते त्याच्या सर्व खाडींवरून भरून वाहील, त्याच्या सर्व किनाऱ्यांवरून वाहील, हे इम्मानुएला! तो महाप्रलय यहूदीयावरही चढेल, तिच्यावरून गरगर फिरेल, तिच्यामधून जाईल आणि तिच्या गळ्यापर्यंत पोहोचेल. त्याचे पसरलेले पंख तुमच्या देशाचा विस्तार झाकून टाकतील.” युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत. याहवेहचा शक्तिशाली हात माझ्यावर ठेवून मला असे म्हणतात, या लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस: “ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही कारस्थान म्हणू नका; त्यांना ज्याचे भय वाटते त्याला तुम्ही भिऊ नका, आणि त्याची धास्ती घेऊ नका. याहवेह जे सर्वसमर्थ आहेत, त्यांना तुम्ही पवित्र मानावे, तेच आहेत ज्यांचे तुम्ही भय धरावे, तेच आहेत ज्यांना तुम्ही घाबरावे. इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी; ते एक पवित्रस्थान असतील, लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक, ज्यामुळे ते पडतील. आणि यरुशलेमच्या लोकांसाठी तो एक सापळा आणि पाश होईल. त्यांच्यापैकी पुष्कळजण अडखळतील; ते पडतील आणि तुटून जातील, ते जाळ्यात अडकतील आणि बंदिवान केले जातील.”

सामायिक करा
यशया 8 वाचा

यशया 8:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराने मला म्हटले, “एक मोठी पाटी घेऊन तिच्यावर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर-शालाल-हाश-बज (लूट त्वरा करते, पारध घाई करते) ह्याविषयी.” उरीया याजक व यबरेख्याचा पुत्र जखर्‍या हे विश्वासू साक्षी ह्यांना मी साक्षीला ठेवतो.” मग मी संदेष्ट्रीशी समागम केला; ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला; तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव. कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.” परमेश्वराने मला पुन्हा म्हटले, “हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात; ह्यास्तव प्रभू त्यांच्यावर फरात नदाच्या जलाचा प्रबल व विपुल ओघ म्हणजे अश्शूरचा राजा ह्याचा सर्व दळभार आणील; तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील; त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.” अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल. मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1 परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरून असे बजावून सांगितले होते की, “ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नकोस.” तो म्हणाला : “हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वांना बंड बंड म्हणू नका; ज्याला ते भितात त्याला भिऊ नका, घाबरू नका. तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा. म्हणजे तो तुम्हांला पवित्रस्थान होईल; तथापि इस्राएलाच्या उभय घराण्यांत तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल. त्यांपैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्नभिन्न होतील, पाशांत अडकून धरले जातील.”

सामायिक करा
यशया 8 वाचा