परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर-शालाल-हाश-बज असे लिही.” माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन. मी एका संदेष्ट्रीकडे गेलो. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला मग परमेश्वर मला म्हणाला, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव. कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.” परमेश्वर माझ्याशी पुन्हा बोलला, “हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात, आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात. म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील. तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील. आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल. हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.” अहो लोकांनो युध्द करा, पण तुमचा चुराडा होईल. दूरच्या सर्व देशांनो ऐका; युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुराडा होईल; स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुराडा होईल. योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही, कारण देव आम्हाबरोबर आहे. परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरुन असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको, तो म्हणाला, “हे लोक कोणत्याही गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका, ते ज्याला भितात त्यास तुम्ही भिऊ नका आणि घाबरु नका. सेनाधीश परमेश्वर, त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा आणि तोच एक असा पवित्र आहे, की तुम्हास त्याचा धाक वाटावा. तो एक पवित्रस्थान होईल; परंतु इस्राएलाच्या दोन्ही घराण्याला तो ठेच लागणारा धोंडा व अडखण्याचा खडक आणि यरूशलेमेतील रहिवाश्यास पाश व सापळा असा होईल. पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.”
यश. 8 वाचा
ऐका यश. 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यश. 8:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ