यशया 7:1-12
यशया 7:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरूशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही. दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली. मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा. त्यास सांग, सावध हो, शांत रहा, भिऊ नको किंवा या दोन जळत्या कोलीतांमुळे रसीन, अराम, आणि रमाल्याचा पुत्र पेकह यांच्या उग्र क्रोधामुळे खचून जाऊ नको. अराम, एफ्राईम, व रमाल्याच्या पुत्राने तुमच्या विरूद्ध दुष्ट योजना केली आहे, ते म्हणतात, आपण यहूदावर चालून जाऊ व त्यास घाबरे करू, त्याची तटबंदी फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करु. प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही, कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत. एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.” परमेश्वर पुन्हा आहाजाशी बोलला, “तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.” परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”
यशया 7:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जीया ह्याच्या दिवसांत असे झाले की अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही. ‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली. तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “तू आपला पुत्र शआर-याशूब (अवशेष परत येईल) ह्याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजाला भेटायला जा; आणि त्याला सांग की, ‘सावध हो व शांत राहा; भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणार्या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस. अराम, एफ्राईम व रमाल्याचा पुत्र ह्यांनी तुझ्याविरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की, आपण यहूदावर चालून जाऊन त्यांना धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलाच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू. प्रभू परमेश्वर म्हणतो : हे सफळ व्हायचे नाही, हे घडायचे नाही. अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.) एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’ परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला : “तुझा देव परमेश्वर ह्याच्याकडे तू आपणासाठी चिन्ह माग; ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो.” आहाज म्हणाला, “मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”