YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 53:3-10

यशया 53:3-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता. ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत, असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्यास किरकोळ मानले. पण खरोखर त्याने आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहिले; तरी आम्ही देवाने त्यास शिक्षा केलेली, देवाने त्यास हाणलेला आणि पीडलेला असा आम्ही विचार केला. पण आमच्या बंडखोर कृत्यांच्या कारणांमुळे तो भोसकला गेला; आमच्या अपराधांमुळे तो चिरडला गेला. आमच्या शांतीसाठी त्याच्यावर शिक्षा आली, त्याच्या जखमांनी आम्हास आरोग्य मिळाले. पण आम्ही मेंढराप्रमाणे बहकून दूर गेलो होतो; आम्ही सर्व आपापल्या मार्गात फिरलो होतो, आणि परमेश्वराने आमचे सर्व अपराध त्याच्यावर ठेवले. त्याच्यावर अत्याचार झाले; तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही; जसे कोकरू कापणाऱ्यापुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही. बळजबरी करून आणि निवाडा करून त्यास दोषी ठरवून, पण त्यास जिवंतांच्या भूमीतून काढून नेले; कारण माझ्या लोकांच्या अपराधांमुळे त्याच्यावर दंड ठेवण्यात आला. त्या पिढीपासून कोणी त्याच्याबद्दल असा विचार केला काय? त्याची कबर दुष्टांबरोबर करण्याचा त्यांचा बेत होता, त्याच्या मृत्यूनंतर त्यास श्रीमंताबरोबर पुरले. तरी त्याने काही हिंसा केली नव्हती किंवा त्याच्या मुखात काही कपट नव्हते. तरी परमेश्वराची इच्छा होती त्यास जखमी अवस्थेत ठेचावे; जर तुम्ही लोक त्याचे जीवन पापार्पण करता, तो त्याची संतती पाहील, तो आपले दिवस दीर्घ करील आणि परमेश्वराचा उद्देश त्याच्याद्वारे परिपूर्ण होईल.

सामायिक करा
यशया 53 वाचा

यशया 53:3-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले, कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता. जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता. तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले, आणि आमचे क्लेश वाहिले, आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली, त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली. परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष त्याच्यावर लादला. त्याला छळले व जाचले, तरीही त्याने आपले मुख उघडले नाही; वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही. अत्याचार करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले. तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला? कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला; माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली. दुष्ट माणसांच्या सोबत त्याला कबर नेमून देण्यात आली, आणि श्रीमंताच्या कबरेमध्ये पुरण्यात आले, परंतु त्याने काहीही हिंसा केली नव्हती, आणि त्याच्या मुखात कोणतेही कपट नव्हते. परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती, आणि जरी त्याचे जीवन पापार्पण म्हणून अर्पण झाले, तरी तो त्याची संतती बघेल आणि त्याचा जीवनकाल लांबेल, आणि याहवेहची इच्छा त्याच्या हातून सिद्धीस जाईल.

सामायिक करा
यशया 53 वाचा

यशया 53:3-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्‍यांपुढे गप्प राहणार्‍या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले; जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडन करण्यात आले; असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली; तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.

सामायिक करा
यशया 53 वाचा

यशया 53:3-10

यशया 53:3-10 MARVBSIयशया 53:3-10 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा