यशया 38:9-20
यशया 38:9-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया आजारी होता आणि त्यातून बरा झाल्यावर त्याने लिहिलेली ही प्रार्थना आहेः मी म्हणालो, मी माझ्या आयुष्याच्या अर्ध्यामार्गात असता मी मृतलोकांच्या द्वारात जाईन; माझ्या राहिलेल्या वर्षात मला विसाव्यासाठी तेथे पाठवले. मी म्हणालो की, “मी परमेश्वरास, जिवंतांच्या भूमीत परमेश्वरास आणखी पाहणार नाही; मी जगातील राहणाऱ्यांना किंवा मानवजातीला आणखी पाहणार नाही. माझे जीवन काढून घेतले आहे, आणि मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझ्यापासून दूर केलेली आहे; मी विणकऱ्याप्रमाणे आपले जीवन गुंडाळले आहे; तो मला मागावरून कापून काढणार आहे; दिवसाच्या व रात्रीच्यामध्ये तू माझा शेवट करशील. मी सकाळपर्यंत रडत राहिलो; सिंहाप्रमाणे तो माझी सर्व हाडे मोडतो; दिवसाच्या व रात्रीच्यामध्ये तू माझ्या जीवनाचा शेवट करशील. मी निळवीप्रमाणे किलबिललो; पारव्याप्रमाणे मी कुंजन केले; माझे डोळे वर पाहून पाहून थकले आहेत. माझ्या प्रभू, माझ्यावर जुलूम झाला आहे. मला मदत कर.” मी काय बोलू? त्याने दोन्ही केले, तो माझ्याशी बोलला आणि त्याने ते केले आहे; मी आपल्या जीवनात हळूहळू चालेल कारण माझ्या जिवाला खूप क्लेश झाले. हे प्रभू, तू माझ्यावर दुःखे पाठवली ती माझ्या चांगल्यासाठी आहेत. माझे जीवन मला परत मिळेल; तू माझे जीवन व आरोग्य परत मिळवून दे. माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे. तूच मला नाशाच्या खळग्यातून वाचवले आहेस. कारण माझी सर्व पापे तू मागे फेकली आहेस. कारण अधोलोक तुझे आभार मानीत नाही. मृत्यू तुझी स्तुती करत नाही; जे खाली खोल खड्ड्यात जातात त्यांना तुझ्या सत्याची आशा नसते. जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे; पित्याने मुलांना तुझ्या सत्याची जाणीव करून द्यावी. “परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे आणि आम्ही आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वराच्या मंदिरात संगीतासह साजरा करू.”
यशया 38:9-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने त्याच्या आजारपणा नंतर आणि बरा झाल्यावर केलेले लिखाण: मी म्हणाला, “माझ्या जीवनाच्या बहराच्या काळात मला मृत्यूच्या दारातून जावे लागेल काय आणि माझी उरलेली वर्षे लुटली जावी काय?” मी म्हणालो, “मी जिवंतांच्या देशात पुन्हा याहवेह यांना स्वतः पाहणार नाही; येथून पुढे मला माझे सहकारी दिसणार नाहीत, किंवा जे आता या जगात आहेत त्यांच्याबरोबर मी राहणार नाही. मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझे घर पाडले गेले आणि माझ्याकडून काढून घेतले गेले. विणकराप्रमाणे मी माझे जीवन गुंडाळून टाकले आहे, आणि त्यांनी मला विणकऱ्याच्या मागापासून तोडून टाकले आहे; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले. मी धीर धरून पहाटेपर्यंत वाट पाहिली, परंतु सिंहासारखे त्यांनी माझी सर्व हाडे मोडली; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले. मी निळवी किंवा सारसाप्रमाणे चित्कारलो मी शोक करणाऱ्या कबुतरासारखा कण्हत राहिलो. आकाशाकडे पाहून माझे डोळे दुर्बल झाले. मला धमकाविण्यात आले आहे; हे प्रभू, मला मदत करण्यासाठी या!” परंतु मी काय बोलू शकतो? ते माझ्याशी बोलले आहेत आणि त्यांनी स्वःताच हे केले आहे. कारण माझ्या या तीव्र मनोवेदनेमुळे माझी सर्व वर्षे मी नम्रपणाने चालेन. हे प्रभू, अशा गोष्टी करून लोक जगतात; आणि माझ्या आत्म्याला त्यांच्यामध्येही जीवन सापडते. तुम्ही माझे आरोग्य पुनः प्रदान केले आहे आणि मला जीवन दिले आहे. अशा मनोवेदना मी सहन करणे निश्चितच माझ्या भल्याचे होते. तुमच्या प्रेमाखातर तुम्ही मला नाशाच्या गर्तेपासून वाचविले; तुम्ही माझी सर्व पापे तुमच्या पाठीमागे टाकली आहेत. कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही, मृत्यू तुमचे स्तुतिगान करू शकत नाही. जे खाली गर्तेत जातात ते तुमच्या विश्वासूपणाची आशा करू शकत नाहीत. जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात. याहवेह मला वाचवतील, आणि आपण याहवेहच्या मंदिरात आपल्या आयुष्याचे सर्व दिवस तंतुवाद्याच्या साहाय्याने गाणी गात राहू.
यशया 38:9-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदाचा राजा हिज्कीया दुखण्याने पडला होता तो त्यातून वाचल्यावर त्याने लेख लिहिला तो हा : मी म्हटले, माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत1 मी अधोलोकाच्या द्वारात प्रवेश करीन; माझ्या आयुष्याची अवशिष्ट वर्षे माझ्यापासून हिरावून घेतली आहेत. मी म्हटले, मला परमेशाचे, जिवंतांच्या भूमीवर असता परमेशाचे दर्शन होणार नाही; मी जगातील रहिवाशांसह राहून2 मनुष्य माझ्या दृष्टीस इत:पर पडणार नाही. माझे घर मोडले आहे, ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे; कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे; तो मागाच्या ताण्यांतून मला तोडणार आहे; दिवस जाऊन रात्र येईल तेव्हा तू माझा अंत करशील. सकाळपर्यंत मी आपले मन शांत करीत राहिलो; तो सिंहाप्रमाणे माझी सर्व हाडे मोडणार; दिवस जाऊन रात्र येईल तेव्हा तू माझा अंत करशील. निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो. आता मी काय सांगू? त्याने मला वचन दिले व त्याप्रमाणे केलेही; माझ्या जिवाच्या पीडेस्तव माझी सर्व वर्षे मी संथपणे क्रमीन. हे प्रभू, अशा गोष्टीच्या योगे लोक जीव धरून राहतात; त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे; म्हणून तूच मला बरे कर व जिवंत ठेव. पाहा, माझ्या बर्यासाठीच ही पीडा मला झाली; तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरला; कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत. अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही, मृत्यू तुझी स्तुती गात नाही; शवगर्तेत उतरलेले तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत. जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो. परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे; म्हणून आम्ही आपली तंतुवाद्ये वाजवू; ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजवू.”