यशया 38
38
हिज्कीयाचे दुखणे
(२ राजे 20:1-11; २ इति. 32:24-26)
1त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.”
2तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली.
3तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.
4तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो हा :
5हिज्कीयास जाऊन सांग की, “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो.
6मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन.
7परमेश्वर जे बोलला आहे, ते करीलच, ह्याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे :
8पाहा, आहाजाच्या शंकुयंत्राच्या पायर्यांवर सूर्याबरोबर छाया दहा पायर्या उतरली आहे, तिला परत दहा पायर्या वर आणतो.” तेव्हा सूर्याबरोबर छाया दहा पायर्या उतरली होती ती दहा पायर्या मागे सरकली.
9यहूदाचा राजा हिज्कीया दुखण्याने पडला होता तो त्यातून वाचल्यावर त्याने लेख लिहिला तो हा :
10मी म्हटले, माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत1 मी अधोलोकाच्या द्वारात प्रवेश करीन; माझ्या आयुष्याची अवशिष्ट वर्षे माझ्यापासून हिरावून घेतली आहेत.
11मी म्हटले, मला परमेशाचे, जिवंतांच्या भूमीवर असता परमेशाचे दर्शन होणार नाही; मी जगातील रहिवाशांसह राहून2 मनुष्य माझ्या दृष्टीस इत:पर पडणार नाही.
12माझे घर मोडले आहे, ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे; कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे; तो मागाच्या ताण्यांतून मला तोडणार आहे; दिवस जाऊन रात्र येईल तेव्हा तू माझा अंत करशील.
13सकाळपर्यंत मी आपले मन शांत करीत राहिलो; तो सिंहाप्रमाणे माझी सर्व हाडे मोडणार; दिवस जाऊन रात्र येईल तेव्हा तू माझा अंत करशील.
14निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो.
15आता मी काय सांगू? त्याने मला वचन दिले व त्याप्रमाणे केलेही; माझ्या जिवाच्या पीडेस्तव माझी सर्व वर्षे मी संथपणे क्रमीन.
16हे प्रभू, अशा गोष्टीच्या योगे लोक जीव धरून राहतात; त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे; म्हणून तूच मला बरे कर व जिवंत ठेव.
17पाहा, माझ्या बर्यासाठीच ही पीडा मला झाली; तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरला; कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत.
18अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही, मृत्यू तुझी स्तुती गात नाही; शवगर्तेत उतरलेले तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत.
19जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो.
20परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे; म्हणून आम्ही आपली तंतुवाद्ये वाजवू; ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजवू.”
21यशयाने सांगितले होते की, “अंजिराची एक चांदकी आणून गळवावर बांधा म्हणजे त्याला गुण पडेल.”
22हिज्कीयाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन ह्याचे चिन्ह काय?”
सध्या निवडलेले:
यशया 38: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.