यशया 28:9-13
यशया 28:9-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो कोणाला ज्ञान शिकवील? आणि तो कोणाला निरोप समजावेल? दुग्धापासून दूर केलेल्यांना किंवा स्तनपानापासून दूर केलेल्यांना काय? कारण नियमा वर नियम, नियमावर नियम, ओळीवर ओळ, ओळीवर ओळ, इथे थोडे, तिथे थोडे, असे आहे. खरच, तोतऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेने तो या लोकांशी बोलेल. पूर्वी तो त्यांना म्हणाला, “येथे विश्रांती आहे, थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या, आणि हे उत्साहवर्धक आहे.” पण ते काही ऐकेनात. लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
यशया 28:9-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तो कोणाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे? त्याचा संदेश तो कोणाला समजावून सांगत आहे? त्यांच्या दूध तुटलेल्या बालकांना, नुकतेच स्तनपान झालेल्या तान्ह्या बाळांना? कारण हे आहे: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे.” ठीक आहे, तर परदेशी ओठांनी आणि अपरिचित वाणीने परमेश्वर या लोकांशी बोलतील, ज्यांना ते असे म्हणाले, “हे विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे, थकलेल्यांना विश्रांती घेऊ द्या;” आणि, “ही विश्राम करण्याची जागा आहे;” परंतु ते ऐकणार नाहीत. म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— जेणेकरून ते मागे पडतील; ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.
यशया 28:9-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“तो कोणाला ज्ञान शिकवतो? कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यांना काय? थानतुट्या बालकांना काय? कारण नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; असे तो बोलत असतो.” तोतर्यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल; तो त्यांना म्हणाला होता, “ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या; त्याने त्याला आराम होईल,” तरी ते ऐकतना. ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.