इब्री 9:1-10
इब्री 9:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते कारण मंडपामध्ये खोल्या तयार केल्या होत्या, बाहेरील खोली त्यास पवित्रस्थान असे म्हणले आहे. त्यामध्ये दिव्यांचे झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या. आणि दुसऱ्या पडद्यामागे एक मंडप होता, त्यास परमपवित्रस्थान म्हणत त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची धूपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोष लाकडी पेटी होती. त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात मान्ना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या. या कोषावर गौरवाचे करुबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु आता याबाबत सविस्तर सांगत नाही. या वस्तूंच्या अशा व्यवस्थेनुसार याजकगण उपासना करायला पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत. पण केवळ एकटा महायाजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या मंडपात जाई, तो स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय तो आत जात नाही. याद्वारे पवित्र आत्मा दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट झाली नाही. तो मंडप वर्तमान काळात दृष्टांतरूप आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्यास वाहिलेली अर्पणे यामुळे उपासना करणाऱ्यांचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत ती अर्पिण्यात येतात. हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.
इब्री 9:1-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते. एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत. दुसर्या पडद्याच्या मागे एक खोली होती; तिला परमपवित्रस्थान म्हणत असत. त्या खोलीत सोन्याचे धुपाटणे व शुद्ध सोन्याने सर्व बाजूंनी पूर्णपणे मढवलेला कराराचा कोश होता. थोडा मान्ना असलेले एक सुवर्ण पात्र आणि अहरोनाची कळ्या आलेली काठी, करारच्या दगडी पाट्या या वस्तू होत्या. आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबिम होते; पण एवढा तपशील पुरे. या गोष्टींची अशी व्यवस्था लावल्यानंतर, आपले सेवाकार्य करण्यासाठी याजक नियमितपणे या बाहेरील खोलीत प्रवेश करीत, पण आतल्या खोलीत फक्त प्रमुख याजकच प्रवेश करीत असे, आणि तेही वर्षातून एकदाच. तो स्वतःसाठी आणि लोकांनी अज्ञानाने केलेल्या पापांसाठी रक्त अर्पण करत असतो आणि रक्ताशिवाय तो इथे कधीही प्रवेश करीत नाही. या सर्व गोष्टींवरून पवित्र आत्मा आपल्याला हे निदर्शनास आणून देतात की जोपर्यंत जुना मंडप आणि त्यातील कार्यक्रम चालू होते तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नव्हता. हे वर्तमान काळासाठी उदाहरण आहे, तेथे अर्पण केलेली दाने व अर्पणे उपासकाची विवेकबुद्धी शुद्ध करीत नाही. हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत.
इब्री 9:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते. कारण पहिला मंडप तयार केलेला होता त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्रस्थान म्हटले आहे. आणि दुसर्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता; त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या; आणि त्याच्यावरचे गौरवशाली करूबीम दयासनावर छाया करत होते; ह्यांविषयी आता सविस्तर सांगत नाही. ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात; परंतु दुसर्यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही. तेणेकरून पवित्र आत्मा दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट झाली असे नाही.2 तो मंडप वर्तमानकाळी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात. खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.
इब्री 9:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व मानवांनी तयार केलेले पवित्र स्थानही होते. पहिला मंडप तयार केलेला होता. त्यात दीपस्तंभ, टेबल व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्र स्थान म्हटले आहे; दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता; त्यात सोन्याचे धुपाटणे व चहूबाजूंनी सोन्याने मढविलेली कराराची पेटी होती; ह्या पेटीत मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, पालवी फुटलेली अहरोनची काठी व कराराच्या दोन पाट्या होत्या तेजस्वी करूबिम दयासन आच्छादीत होते; परंतु याविषयी सविस्तर बोलण्याची ही वेळ नाही. ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केली असता याजक धार्मिक विधी करण्यास पहिल्या मंडपात नियमितपणे जात असत; परंतु दुसऱ्यांत प्रमुख याजक वर्षांतून एकदा एकटाच जात असे तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या नकळत केलेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करीत असत, ते घेतल्याशिवाय जात नसे. ह्यावरून पवित्र आत्मा दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे, तोपर्यंत परमपवित्र स्थानाचा मार्ग प्रकट झाला नाही. तो मंडप वर्तमानकाळासाठी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करावयास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात. खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांच्यासह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत. ते नवीन व्यवस्था प्रस्थापित होईपर्यंत लावून दिले आहेत.