इब्री 4:9-13
इब्री 4:9-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही विसाव्याचा दिवस आहे. कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता. म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये. कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे. आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
इब्री 4:9-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे. यास्तव, त्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करू या. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणामुळे कोणाचाही नाश होऊ नये. कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे. संपूर्ण सृष्टीतील काहीही परमेश्वराच्या दृष्टीपासून लपलेले नाही. ज्यांना आपण हिशोब देणे आवश्यक आहे, त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वकाही अनावृत व उघडे आहे.
इब्री 4:9-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. कारण जो ‘कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे’ त्यानेही, जसा ‘देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला’, तसा ‘आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.’ म्हणून त्या ‘विसाव्यात येण्याचा’ आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे.
इब्री 4:9-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मात्र देवाच्या लोकांसाठी साबाथाचा विसावा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात येतो, तो जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला, तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतो. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अविश्वासाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्यापैकी कोणी अपयशी ठरू नये. वास्तविक देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा धारदार असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचा न्याय करणारे असे आहे; त्याच्या दृष्टीला अदृश्य काहीच नाही, ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे, असे सृष्टीतील सर्व काही त्याच्या दृष्टीला उघड व प्रकट केलेले आहे आणि आपणा सर्वांना स्वतःविषयी त्याला हिशोब द्यावा लागणार आहे.