YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 4

4
परमेश्वराच्या लोकांना शब्बाथाचा विसावा
1यास्तव, ज्याअर्थी त्याच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापि कायम आहे, त्याअर्थी तुमच्यातील कोणीही उणा पडू नये म्हणून काळजी घ्या. 2कारण ही शुभवार्ता जशी त्यांना तशी आपल्यालाही सांगितली होती; पण जो संदेश त्यांनी ऐकला त्यामुळे त्यांचे काहीही भले झाले नाही, कारण ज्यांनी आज्ञापालन केले त्यांच्या विश्वासात ते सहभागी झाले नाहीत. 3ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच विसाव्यात जाता येते, जसे परमेश्वराने म्हटले,
“मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हटले,
ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.”#4:3 स्तोत्र 95:11; आणि वचन 5
जरी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वर त्यांना स्वीकारावयास सिद्ध आहे व त्यांची वाट पाहत आहे. 4कारण सातव्या दिवसाबद्दल असे कोठेतरी लिहिले आहे, “परमेश्वराने सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”#4:4 उत्प 2:2 5अजून वरील भागात परमेश्वर म्हणतात, “ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.”
6तरी, ते अभिवचन कायम असून काहीजण त्या विसाव्यात जातात, पण पहिल्याने ज्यांना शुभवार्ता ऐकण्याची संधी मिळाली तरी त्यांनी आज्ञा मोडल्यामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत. 7परंतु विसाव्यात प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने दुसरी वेळ नेमली आहे आणि त्याला “आज” असे म्हटले. हे तो फार पूर्वी दावीदाच्या मुखाद्वारे बोलला होता, आधीच उद्धृत केलेल्या शब्दांत तो म्हणाला,
“आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.”#4:7 स्तोत्र 95:7, 8
8जर यहोशवाने त्यांना विसावा दिला असता, तर परमेश्वराने यानंतर दुसर्‍या दिवसाविषयी बोलले नसते. 9तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. 10जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे. 11यास्तव, त्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करू या. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणामुळे कोणाचाही नाश होऊ नये.
12कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे. 13संपूर्ण सृष्टीतील काहीही परमेश्वराच्या दृष्टीपासून लपलेले नाही. ज्याला आपण हिशोब देणे आवश्यक आहे त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वकाही उघडेवाघडे आहे.
येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक
14यास्तव, स्वर्गातून पार गेलेले गेलेला परमेश्वराचे पुत्र येशू असे महान प्रमुख याजक आपणास आहे, म्हणून आम्ही विश्वासाचा पत्कर केलेला आहे तो दृढ धरून ठेऊ या. 15ते असे प्रमुख याजक नाही जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु आपल्याला असे आहे जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले. 16तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य मिळण्यासाठी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ या.

सध्या निवडलेले:

इब्री 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन