YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 2:1-8

इब्री 2:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही. पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा? थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवलेस.” देवाने सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.

सामायिक करा
इब्री 2 वाचा

इब्री 2:1-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आपण ऐकलेल्या गोष्टींकडे फार काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यामुळे बहकून जाऊ नये. कारण ज्याअर्थी देवदूतांद्वारे सांगितलेला संदेश स्थिर होता, आणि प्रत्येक आज्ञेचे उल्लंघन व आज्ञाभंग करणार्‍यांना योग्य शिक्षा मिळाली. ज्या तारणाची प्रभुने प्रथम घोषणा केली, आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू? परमेश्वराने चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे चमत्कार करून साक्ष दिली, आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या इच्छेनुसार विशिष्ट दाने वाटून दिली आहेत. ज्या येणार्‍या जगाबद्दल आपण बोलत आहोत, ते जग देवदूतांच्या हाती सोपवून दिलेले नाही. परंतु एका ठिकाणी एकाने अशी साक्ष दिली आहे: “मर्त्य मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी, आणि मानवपुत्र कोण की त्याची काळजी करावी? कारण काही काळ तुम्ही त्यांना देवदूतांहून कमी दर्जाचे केले होते; तुम्ही त्यांना गौरवाने व सन्मानाने मुकुटमंडित केले आहेस, आणि सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आहे.” सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या असताना, परमेश्वराने कोणतीच गोष्ट अशी ठेवली नाही की जी त्यांच्या स्वाधीन केली नाही. तरी सध्या हे सर्व स्वाधीन केल्याचे आपण अद्यापि पाहिले नाही.

सामायिक करा
इब्री 2 वाचा

इब्री 2:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणार्‍यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले; त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, “मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावीस? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावेस? तू त्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले आहेस; तू त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस; आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहेस; तू सर्वकाही त्याच्या अधीन — त्याच्या पायांखाली — ठेवले आहेस.” ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाहीस; परंतु ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.

सामायिक करा
इब्री 2 वाचा

इब्री 2:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्या कारणामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाही तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. आपल्या पूर्वजांकरिता देवदूतांद्वारे सांगितलेले वचन जर खरे ठरले आणि प्रत्येक उ्रंघनाची व आज्ञाभंगाची यथान्याय्य शिक्षा मिळाली, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्या सर्वांना प्रमाण पटविले; त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुत कृत्ये व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची वरदाने वाटून साक्ष दिली. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. उलट, पवित्र शास्त्रात कोणी एकाने साक्ष दिली आहे: मानव तो काय की, तू त्याची आठवण ठेवावी? अथवा मानवपुत्र तो काय की, तू त्याची काळजी घ्यावी? तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे; तू त्याला वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू तुझ्या हाताच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. ‘तू सर्व काही त्याच्या अधीन - त्याच्या पायांखाली - ठेवले आहे’, सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही; परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.

सामायिक करा
इब्री 2 वाचा