इब्री 11:32-38
इब्री 11:32-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफ्ताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल. विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली. त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तलवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले. आणखी दुसर्यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला. त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तलवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पीडलेले होऊन ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून भटकले. जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले.
इब्री 11:32-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावीत? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्टा यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही. विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली, व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली; आणि अग्निज्वालांच्या प्रकोपाला थंड केले; काहींचा तलवारीच्या धारेपासून बचाव झाला; काहीजण जे अशक्त होते, ते सबळ झाले; इतरांना लढाईमध्ये मोठे बळ प्राप्त झाले; त्यांनी परकीय सैन्ये परतवून व पळवून लावली. काही स्त्रियांना विश्वासाद्वारे त्यांचे मेलेले प्रियजन परत जिवंत असे मिळाले. पण दुसर्या काहींना विश्वासामुळे मरेपर्यंत छळ सोसावा लागला, तरीही सुटका करून घेण्यापेक्षा पुढे याहून चांगल्या जीवनात आपले पुनरुत्थान होईल, असा त्यांचा विश्वास होता. काहींची हेटाळणी झाली आणि त्यांना चाबकांचे फटके मारले गेले, तर इतरांना बेड्या ठोकून ते तुरुंगात टाकण्यात आले. काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण बकर्यांची व मेंढयाची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले असे होते. हे जग त्यांच्या योग्यतेचे नव्हते. ते वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत व गुहांत आणि बिळांत राहत असत.
इब्री 11:32-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणांस अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले. आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते; त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.
इब्री 11:32-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे, ह्यांचे वर्णन करू लागलो, तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बल असता सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये धुळीला मिळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे विश्वासामुळे पुनरुत्थान झालेली मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्याचा त्याग करून हालअपेष्टा सोसल्या. काहींना टवाळ्या, मारहाण, बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला; त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना मोहपाशात टाकले, करवतीने कापले, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते; त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत.