इब्री 10:26-34
इब्री 10:26-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्यास दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो. तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्यास पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो मनुष्य किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते? कारण त्यास ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.” जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे. ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हास सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली. काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
इब्री 10:26-34 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही, पण भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच. मोशेने दिलेले नियमशास्त्र एखाद्याने नाकारले तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडवले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र असे मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते? कारण “न्याय करणे माझ्याकडे आहे; मी त्यांची परतफेड करीन,” आणि आणखी, “प्रभू त्यांच्या लोकांचा न्याय करतील,” असे जे म्हणाले, ते आपल्याला माहीत आहे. जिवंत परमेश्वराच्या हातात सापडणे फार भयंकर आहे. जेव्हा तुम्हाला प्रथम प्रकाश मिळाला तेव्हा तुम्हाला भयंकर दुःखसहनाने भरलेला संघर्ष करावा लागला याची आठवण करा. कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला. बंदीवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि तुम्हाला स्वतःची अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली.
इब्री 10:26-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही; तर न्यायाची आणि विरोध्यांस गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता ‘त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.’ तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते ‘कराराचे रक्त’ ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांला वाटते? कारण “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन; असे प्रभू म्हणतो.” आणखी, “परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,” असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहीत आहे. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली; कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.
इब्री 10:26-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले, तर ह्यापुढे पापांबद्दल यज्ञ होणार नाही; न्यायाची आणि विरोधकांना गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची भीतीच उरेल. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला, तर त्याला क्षमा न होता दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडविले, ज्यामुळे तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठोर दंडास पात्र ठरेल? ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन’, आणखी, ‘परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील’, असे कोणी म्हटले हे आपल्याला माहीत आहे. जिवंत परमेश्वराच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. पूर्वीचे दिवस आठवा; त्या वेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने विजयी सामना केला. कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा उपहास झाला; तर कधी कधी अशी दशा झालेल्यांबद्दल तुम्ही सहानुभूती दाखविली. बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली स्वर्गीय मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे जाणून तुम्ही आपल्या ऐहिक मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.