YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 10

10
ख्रिस्ताचा आत्मयज्ञ एकदाचा व अखेरचा
1नियमशास्त्र ज्या येणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया आहे—त्याचे खरे स्वरूप नाही. या कारणासाठी ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच यज्ञांनी उपासनेसाठी जवळ येणार्‍यांना परिपूर्ण करण्यास केव्हाही समर्थ ठरत नाही. 2तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती. 3पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली. 4कारण बैलांचे व बकर्‍यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.
5यास्तव, ख्रिस्त जगात आल्यावर म्हणाले,
“तुम्हाला बली आणि दानाची इच्छा नाही,
परंतु तुम्ही माझ्यासाठी शरीर तयार केले आहे;
6होमार्पणांनी व पापार्पणांनी
तुम्हाला संतोष झाला नाही.
7मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे—पाहा, शास्त्रलेखात मजविषयी म्हटल्याप्रमाणे,
माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.’ ”#10:7 स्तोत्र 40:6-8
8-9ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही, व त्यात तुम्हाला संतोष नाही”—जरी ते नियमानुसार अर्पण करत होते. नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली. 10आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिद्वारे पवित्र केलेले आहोत.
11प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. 12परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत. 13आणि त्या वेळेपासून त्यांचे वैरी त्यांचे पायासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. 14कारण एकाच यज्ञामुळे ज्यांना ते पवित्र करीत आहे, त्या सर्वांना त्यांनी परिपूर्ण केले आहे.
15याबाबत पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो, प्रथम त्यांनी म्हटलेः
16“मी हा करार त्यांच्याबरोबर करेन,
त्या वेळेनंतर, प्रभू म्हणतात,
माझे नियम मी त्यांच्या मनपटलावर घालेन
आणि त्यांच्या अंतःकरणावर लिहीन.”#10:16 यिर्म 31:33
17मग पुढे ते म्हणतात,
“त्यांची पापे व त्यांची नियमबाह्य कृत्ये
मी पुन्हा कधीच स्मरणार नाही.”#10:17 यिर्म 31:34
18आणि जिथे क्षमा झालेली आहे, तिथे पापांसाठी आणखी यज्ञ करण्याची मुळीच गरज नाही.
धीराने विश्वासात टिकून राहण्यासाठी आवाहन
19म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते. 20आपल्यासाठी हा नवा व जीवनदायी मार्ग पडद्याद्वारे म्हणजे त्याच्या शरीराद्वारे उघडला आहे. 21आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत, 22म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ. 23आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत. 24आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या. 25आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे, आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.
26सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही, 27पण भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच. 28मोशेने दिलेले नियमशास्त्र एखाद्याने नाकारले तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. 29तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडवले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र असे मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते? 30कारण “न्याय करणे माझ्याकडे आहे; मी त्यांची परतफेड करीन,”#10:30 अनु 32:36; स्तोत्र 135:14 आणि आणखी, “प्रभू त्यांच्या लोकांचा न्याय करतील,” असे जे म्हणाले, ते आपल्याला माहीत आहे. 31जिवंत परमेश्वराच्या हातात सापडणे फार भयंकर आहे.
32जेव्हा तुम्हाला प्रथम प्रकाश मिळाला तेव्हा तुम्हाला भयंकर दुःखसहनाने भरलेला संघर्ष करावा लागला याची आठवण करा. 33कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्‍यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला. 34बंदीवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि तुम्हाला स्वतःची अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली. 35तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.
36तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे. 37कारण,
“अगदी थोड्या वेळात,
जो येणार आहे तो येईल
आणि उशीर करणार नाही.”#10:37 यश 26:20
38आणि,
“माझा नीतिमान विश्वासाने जगेल.
आणि माघार घेणार्‍यामध्ये
मला संतोष वाटणार नाही.”#10:38 हब 2:4
39माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण आहोत.

सध्या निवडलेले:

इब्री 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन