YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 10:1-10

इब्री 10:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अशाप्रकारे, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. जर नियमशास्त्र लोकांस परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर पापांची भावना नसल्याने दोषी ठरले नसते. परंतु त्याऐवजी ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण करून देतात. कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे. म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही. ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होमार्पणे व पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यामध्ये तुला संतोष नव्हता.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे करण्यात येतात.) मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो. देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.

सामायिक करा
इब्री 10 वाचा

इब्री 10:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नियमशास्त्र ज्या येणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया आहे—त्याचे खरे स्वरूप नाही. या कारणासाठी ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच यज्ञांनी उपासनेसाठी येणार्‍यांना परिपूर्ण करण्यास केव्हाही समर्थ ठरत नाही. तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती. पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली. कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले, “यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही, परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले; होमार्पण व पापार्पण यांनी तुम्हाला संतोष झाला नाही. मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे, हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ ” ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते. नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली. आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.

सामायिक करा
इब्री 10 वाचा

इब्री 10:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर मग ज्या पुढे होणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणार्‍यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? परंतु त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्षे पापांची आठवण होत आहे; कारण बैलांचे व बकर्‍यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो जगात येतेवेळेस म्हणाला, “यज्ञ व अन्नार्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस; होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष नव्हता” (ती नियम-शास्त्राप्रमाणे अर्पण करण्यात येतात); मग तो म्हणाला, “[हे देवा,] पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे.” ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.

सामायिक करा
इब्री 10 वाचा

इब्री 10:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून नियमशास्र प्रतिवर्षी अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी देवाजवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते, तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापांची जाणीव नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्षे पापांचे स्मरण होत आहे; कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. परिणामत: जगात येताना ख्रिस्त देवाला म्हणाला, यज्ञ व अर्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले; वेदीवर संपूर्ण प्राणी जाळल्याने व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष होत नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, पाहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे तो प्रथम म्हणाला, ‘यज्ञ, अर्पणे, होमार्पणे व पापांबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष होत नव्हता’; (नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पण करण्यात येतात ती ही); आणि मग तो म्हणाला, ‘पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे’. ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या देवाच्या इच्छेनुसार आपण येशू ख्रिस्ताने एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.

सामायिक करा
इब्री 10 वाचा