YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हाग्गय 2:10-23

हाग्गय 2:10-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्याद्वारे परमेश्वराचे वचन आले, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आता तू याजकांना नियमशास्त्राविषयी विचार आणि म्हण, जर कोणी आपल्या वस्त्राच्या पदरातून समर्पित मांस नेतो. त्याच्या पदराने भाकरीला, किंवा कालवणाला, द्रक्षरस किंवा तेल, किंवा इतर अन्नाला स्पर्श झाला, तर या सर्व वस्तू पवित्र होतील का? याजकांनी उत्तर दिले, “नाही.” मग हाग्गय म्हणाला, “जर प्रेताला स्पर्श केल्यामुळे, कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशासही स्पर्श केला, तर ते अशुद्ध होईल का?” याजक म्हणाले, “हो! तेसुध्दा अशुद्ध होईल.” मग हाग्गयाने उत्तर दिले आणि म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तसे हे लोक व तसे हे राष्ट्र माझ्यासमोर आहे, तसे त्यांचे हाताचे प्रत्येक काम आहे, तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे. तर आता आमच्या पूर्वी परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड ठेवण्याच्या पूर्वीची पद्धत कशी होती याचा विचार करा. त्या दिवसात जर कोणी वीस मापे धान्याच्या राशीजवळ आला तर त्याच्या हाती दहा मापेच लागत. द्राक्षकुंडातून पन्नास पात्रे भरून काढावयास गेला तर त्यास फक्त वीसच मिळत होते. मी तुम्हास आणि तुमच्या हातच्या सर्व कामावर पाठवलेले रोग आणि बुरशी यांनी पीडले पण तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. “आजच्या पूर्वीची स्थिती कशी होती याचा विचार करा. नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवसापासून ज्या दिवशी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या दिवसापासून स्थिती कशी होईल याचा विचार करा. कोठारात अजून बीज आहे काय? द्राक्षवेल, अंजीराचे झाड, डाळिंब, आणि जैतून झाड ह्यांनी काही उत्पन्न दिले नाही! पण या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन!” मग महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, हाग्गयाकडे परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा आले आणि म्हणाले, यहूदाचा राज्यपाल जरुब्बाबेलाशी बोल व सांग, मी आकाश आणि पृथ्वी हालवीन. मी राज्यांचे सिंहासन उलथवून टाकीन आणि राष्ट्रांचे बळ नष्ट करीन! मी त्यांच्या रथांना व सारथ्यांना उलथून टाकीन. त्यांचे घोडे व सारथी खाली पडतील, कारण प्रत्येकजण आपल्या भावाच्या तलवारीने पडेल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्यादिवशी हे शल्तीएलाच्या मुला, जरुब्बाबेला, माझ्या सेवकाप्रमाणे मी तुला घेईन, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला मुद्रांकित अंगठीप्रमाणे करीन, कारण मी तुला निवडले आहे! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

सामायिक करा
हाग्गय 2 वाचा

हाग्गय 2:10-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहचे हे वचन आले: “सर्वसमर्थ याहवेहचे असे म्हणणे आहे: ‘याजकांना विचार नियमशास्त्र काय म्हणते: तुमच्यापैकी कोणी आपल्या झग्यामध्ये पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्यावेळी त्याच्या झग्याचा स्पर्श भाकर, द्राक्षारस अथवा मांस यांना झाला, तर स्पर्श झालेला पदार्थ पवित्र होईल काय?’ ” त्यावर याजकांनी उत्तर दिले, “नाही.” मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?” याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.” नंतर हाग्गयने म्हटले, “ ‘तर हे लोक व हे राष्ट्र माझ्या नजरेत हे असेच आहे,’ याहवेह जाहीर करतात. ‘ते जे काही करतात व जी अर्पणे आणता ती अपवित्र असतात. “ ‘आता तुम्ही आजपासून गंभीरपणे याचा विचार करा; याहवेहचे मंदिर बांधण्यास आरंभ केला तेव्हा एका दगडावर दुसरा दगड ठेवीपर्यंत सर्व परिस्थिती कशी होती. जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे. तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात. ‘आजपासून म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, ज्या दिवशी याहवेहच्या मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाले, त्या दिवसाचा गंभीरपणे विचार करा. गंभीरपणे विचार करा: धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत. “ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ” त्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी याहवेहकडून हाग्गयला दुसऱ्यांदा वचन आले: “यहूदीयाचा राज्यपाल जरूब्बाबेलला सांग, मी आकाश व पृथ्वी हलवून सोडणार आहे. सर्व राष्ट्रांमधील राजासने उलथून टाकेन व परकियांचे सामर्थ्य डळमळीत करणार आहे. मी त्यांचे रथ व त्यांचे सारथी उलथून टाकेन; घोडे व त्यावरील स्वार पडतील, प्रत्येकजण त्याच्या भावाच्या तलवारीने पडेल. “ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”

सामायिक करा
हाग्गय 2 वाचा

हाग्गय 2:10-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

दारयावेशाच्या कारकिर्दिच्या दुसर्‍या वर्षी नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे हे वचन आले : सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “याजकांना शास्त्राचा अर्थ विचारा की, ‘कोणी समर्पित मांस आपल्या वस्त्राच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराचा भाकरीला, कालवणाला, द्राक्षारसाला, तेलाला किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला, तर ते पवित्र होईल काय?”’ तेव्हा याजकांनी “नाही” असे उत्तर दिले. मग हाग्गय म्हणाला, “प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला ह्यांपैकी कशासही शिवला, तर ते अशुद्ध होईल ना?” तेव्हा याजकांनी “होईल” असे उत्तर दिले. हाग्गयाने म्हटले, “परमेश्वर म्हणतो की ह्या लोकांची व ह्या राष्ट्राची माझ्या दृष्टीने अशीच स्थिती आहे, आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम असेच आहे; तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे. आजपासून मागची, म्हणजे परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड रचण्यापूर्वीची, जी स्थिती होती तिच्याकडे लक्ष पुरवा; त्या सर्व दिवसांत कोणी वीस मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती दहा लागत; द्राक्षकुंडांतून पन्नास पात्रे भरून काढण्यास गेला तर त्याला वीसच मिळत. मी तुमच्यावर, तुमच्या हातच्या सर्व कामांवर तांबेरा, भेरड व गारा ह्यांचा मारा केला; तरी तुमच्यातला एकही माझ्याकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव आजपासून मागच्या म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या मागच्या काळाकडे लक्ष पुरवा. कोठारांत काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून ह्यांना काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हांला आशीर्वाद देईन.” महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गयाला परमेश्वराचे वचन दुसर्‍यांदा प्राप्त झाले की, “यहूदाचा प्रांताधिकारी जरूब्बाबेल ह्याला सांग : मी आकाश व पृथ्वी ही हलवून सोडीन; मी राज्यांचे तक्त उलथून टाकीन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन; रथ व रथी उलथून टाकीन, घोडे व त्यांवरील स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तलवारीने पडेल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो : त्या दिवशी, हे जरूब्बाबेला, शल्तीएलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी तुला निवडले आहे,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

सामायिक करा
हाग्गय 2 वाचा